नवी दिल्ली - वन-डे विश्वचषकासाठी तीन महिने शिल्लक आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सर्व संघ तयारीत गुंतले आहेत. टीम इंडियाही या स्पर्धेपूर्वी अनेक सामने खेळणार असून, त्यानंतरच विश्वचषकासाठी संघ निवड करणार आहे. मात्र, बीसीसीआयसमोर संघ निवडीपूर्वी निवडीचा आणखी एक मुद्दा आहे. तो म्हणजे, मुख्य निवडकर्ता. याचा शोध सुरू असून, या शर्यतीत अजित आगरकर यांचे नाव पुढे आले आहे.
गेल्या चार महिन्यांपासून बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीमध्ये मुख्य निवडकर्त्याचे पद रिक्त आहे. चेतन शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर अन्य कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. ही पाच सदस्यीय निवड समिती केवळ चार निवडकर्त्यांसोबत काम करत आहे. बीसीसीआयने ही जागा भरण्यासाठी नुकतेच अर्ज मागविले होते. माजी वेगवान गोलंदाज आगरकरचे नाव पाचव्या निवडकर्त्यासाठी आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. समितीच्या या नव्या सदस्याला मुख्य निवडकर्ता बनवले जाईल, असे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत वेगवेगळे अंदाजही लावले जात होते. त्यात माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे नावही चर्चेत होते.
शास्त्री, वेंगसरकर यांचीही नावे चर्चेत
मिळालेल्या माहितीनुसार, आगरकरसह माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांची नावेदेखील चर्चेत आहेत. बीसीसीआयने ६० वर्षांची वयोमर्यादा शिथिल केली. यामुळे रवी शास्त्री हे आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. मात्र, हाच नियम वेंगसरकर यांना लागू होत नाही. यापूर्वी निवड समिती अध्यक्ष म्हणून २००५ ते २००८ पर्यंत ते या पदावर होते. त्यामुळे त्यांच्याकडे फक्त एका वर्षाचाच कार्यकाळ असू शकतो.
वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात दावा केला आहे की, मुंबईचा माजी भारतीय वेगवान गोलंदाज आगरकरला ही भूमिका मिळू शकते. या ४५ वर्षीय दिग्गज वेगवान गोलंदाजाचे नाव दोन वर्षांपूर्वी या पदासाठी चर्चेत होते. परंतु, त्यानंतर चेतन शर्मा यांच्याकडे ही जबाबदारी आली. यावेळी त्यांची निवड निश्चित दिसते. आगरकर सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत.
आगरकर यांनी भारतासाठी २६ कसोटींत ५८ आणि १९१ वनडेत २८८ बळी घेतले. याशिवाय चार टी-२० सामने खेळले आहेत. २००७ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. ३० जून ही अर्जाची अखेरची तारीख आहे. १ जुलै रोजी तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती मुलाखत घेईल. अमोल मुजुमदार आणि माजी प्रशिक्षक तुषार आरोठे, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू जॉन लुईस हे स्पर्धेत आहेत.
Web Title: Ajit Agarkar leads the race for Chief Selector
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.