भारतीय क्रिकेटसाठी टीम इंडियाच्या निवड समितीच्या प्रमुखपदाच्या स्पर्धेत असलेल्या भारताचा माजी फलंदाज अजित आगरकर असल्याचे वृत्त झळकले. त्यानंतर, काही तासांतच अजित आगरकरने तडकाफडकी आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सहायक प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. निवड समिती प्रमुख पदाच्या स्पर्धेत अजित आगरकर उतरल्यामुळे बीसीसीआयला निवड समितीच्या प्रमुखाचे वेतन वर्षासाठी १ कोटीपेक्षा अधिक करावे लागणार आहे. तर, इतर सदस्यांचे वेतनही ९० लाखांपेक्षा जास्त करावे लागेल.
दिल्ली कॅपिटल्सचा सहायक कोच आणि कॉमेंटेटर असलेला अजित आगरकर निवड समितीच्या प्रमुख पदावरील व्यक्तीच्या पगारापेक्षा वर्षाला अधिक कमाई करतो. म्हणूनच, बीसीसीआयच्या या पदांवरील सद्यस्थितीतील पगारावरुन चर्चा होत आहे. पीटीआयने आगरकर प्रमुख निवड समितीच्या स्पर्धेत असल्याचे वृत्त बुधवारी दिले होते. त्यातच, आता दिल्ली कॅपिटल्सच्या सहायक कोच पदाचा राजीनामा दिल्यामुळे अजित आगरकरचे टीम इंडियाच्या निवड समितीतील स्थान पक्के मानले जात आहे.
वेस्ट इंडिजच्या आगामी दौऱ्यासाठी टी-२० टीम इंडियाच्या निवडीसाठी अजित आगरकरच निवड समितीचा प्रमुख असू शकतो. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने या वृत्ताला दुजोरा दिलास असून अजित आगरकर आणि शेन वॅटसन दिल्ली कॅपिटल्सचे सहायक कोच असणार नाहीत. दिल्ली कॅपिटल्सने ट्विट केलं आहे. तुमच्यासाठी हे सदैव तुमचं घर राहिल. धन्यवाद अजित आणि वॅटसन (वाट्टो), पुढील कारकिर्दीस शुभेच्छा, असंही या ट्विटमध्ये म्हटलंय.