वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी पाहण्यासाठी अजित आगरकर पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दाखल झाला आहे. त्याने त्याच्या पहिल्याच संघ निवडीत युवा खेळाडूंना संधी दिली आणि यशस्वी जैस्वाल हा नवा कसोटी ओपनर भारताला मिळाला. ट्वेंटी-२० संघातही युवा खेळाडूंचाच भरणा पाहायला मिळत आहे. पण, यंदाचे वर्ष हे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे असल्याने आगरकरने अद्याप त्यात काही बदल केलेले नाहीत. भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी आगरकर कॅरेबियन बेटांवर दाखल झाला आहे. तेथे तो भारताच्या दोन खेळाडूंच्या आशिया चषक व वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागाविषयी कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वृत्त समोर येतेय.
भारताचा आघाडीचा फिरकीपटू आर अश्विन, जो मागील दीड वर्ष वन डे क्रिकेट खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर निवड समितीने अश्विनला वन डे क्रिकेटमध्ये पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यामुळे अश्विनला आशिया चषक आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडायचे का? हा प्रश्न आगरकरसमोर आहे. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादव ज्याला वन डे क्रिकेटमध्ये काही खास करता आलेले नाही. त्याला संधी द्यायची का? याचे उत्तर मिळवण्यासाठी आगरकर विंडीज दौऱ्यावर गेला आहे.
२०१९च्या वन डे वर्ल्ड कपनंतर अश्विन केवळ दोन वन डे सामना खेळला आहे आणि त्यात १ विकेट घेतली आहे. भारताकडे सद्याच्या घडीला युझवेंद्र चहल, कुलदीप यादव व रवींद्र जडेजा हे तीन पर्याय आहेत, जे विकेट्स घेतात. अक्षर पटेलही रांगेत आहेच. विंडीज दौऱ्यावरील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतही अश्विन खेळणार नाही. निवड समितीने चहल व कुलदीप यांच्यावर विश्वास दाखवला आहे.