T20 World Cup 2024, Indian Squad : अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समिती मंगळवारी अहमदाबादमध्ये BCCIचे सचिव जय शाह ( Jay Shah) यांची भेट घेणार आहे. त्यानंतर अमेरिकेत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ फायनल केला जाईल. मात्र, संघाची अधिकृत घोषणा बुधवारी होऊ शकते. BCCI चे सचिव वरिष्ठ निवड समितीचे निमंत्रक आहेत आणि ते सध्या राजकीय बांधिलकींमध्ये व्यस्त असल्याने ही बैठक अहमदाबादमध्ये होणार असल्याचे समजते.
दुसरा यष्टिरक्षक आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याचे संघातील स्थान हे निवड समितीसोबतच्या बैठकीचे दोन मुद्दे असतील. लोकेश राहुल ( आयपीएलचा स्ट्राइक रेट १४४ आणि ३७८ धावा ) आणि संजू सॅमसन ( १६१ च्या स्ट्राइक रेटने ३८५ धावा) हे दोघं अजूनही दुसऱ्या यष्टिरक्षकाच्या स्थानासाठी शर्यतीत आहेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार सॅमसनने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, परंतु त्याच्या फलंदाजीचा तिसरा क्रमांक हा त्याला भारतीय संघात स्थान मिळण्याच्या मार्गात अडथळा ठरतोय. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने २५ ट्वेंटी-२०त २०च्या सरासरीने व १३५च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्यामुळे फक्त आयपीएलच्या कामगिरीवर त्याची निवड करणे योग्य ठरणार नाही, असा मतप्रवाह आहे.
राहुलच्या बाबतीत, कोचिंग स्टाफमधील एक वरिष्ठ सदस्य त्याच्या समावेशासाठी नक्कीच प्रयत्न करेल, परंतु अनेकांचा असा विश्वास आहे की ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याची शैली ही जुनी आहे. तरीही पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो. जितेश शर्मा व ध्रुव जुरेल यांचा खराब फॉर्म त्यांना या शर्यतीतून बाहेर फेकतोय.