IND vs WI T20I series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीने प्रथमच टीम इंडियाची निवड केली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी भविष्यातील ट्वेंटी-२० संघ कसा असेल याची झलक दाखवली. रोहित शर्मा, विराट कोहलीला पुन्हा एकदा ट्वेंटी-२० संघात संधी मिळालेली नाही. अनेक युवा चेहऱ्यांना संघात स्थान देऊन आगरकरने टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या एका फटक्यात सोडवली. आता टीम इंडियाही इंग्लंडप्रमाणे बेसबॉल क्रिकेट खेळताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको.
रोहित शर्मा ओपनिंगला नव्या 'भिडू'सह खेळणार; सराव सामन्यात दोघांचे अर्धशतक
आघाडीच्या फलंदाजांचे अपयश ही भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या होती. टॉप ऑर्डरचे फलंदाज धावा करत होते, पण ट्वेंटी-२० मध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेल्या वादळी सुरुवात त्यांना करता आलेली नाही. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला याचा फटका सहन करावा लागला होता. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या जोडीने गेल्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये डावाची सुरुवात केली होती, परंतु त्यांना वेगवान सुरुवात करून देता आली नाही.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीपूर्वी रोहित-राहुल या सलामीच्या जोडीने ५ डावात १६च्या सरासरीने केवळ ७९धावा केल्या होत्या. दोन्ही फलंदाजांनी ५ पेक्षा कमी इकॉनॉमीसह धावा केल्या. रोहित-राहुल जोडीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ च्या ६ सामन्यांमध्ये अनुक्रमे ७, ११, २३, ११, २७ आणि ९ धावांची भागीदारी केली. टीम इंडियाची ही अडचण दूर करण्यासाठी आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दोन युवा डावखुऱ्या फलंदाजांना संघात स्थान दिले आहे.
यशस्वी जैस्वालने आक्रमक फलंदाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पहिल्याच षटकापासून तो धडाकेबाज फलंदाजी करतो. यशस्वीने आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी सलामी करताना KKRविरुद्ध केवळ १३ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. याच सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना नितीश राणाच्या पहिल्याच षटकात त्याने २६ धावा ठोकल्या होत्या.
दुसरीकडे तिलक वर्मा जो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी मधल्या फळीत फलंदाजी करतो. त्याने ४७ ट्वेंटी-२० मध्ये ४०च्या सरासीने व १४२ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. वेगवान धावा काढण्याची क्षमताही त्याच्यात आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२०मालिकेत भारतीय व्यवस्थापन या दोन्ही खेळाडूंची चाचणी घेऊ शकते आणि इशान किशनच्या जागी यशस्वीला शुभमन गिलसोबत सलामीची संधी दिली जाऊ शकते. त्याचवेळी वर्माही पदार्पण करू शकतो.
Web Title: Ajit Agarkar's masterstroke, drops Virat Kohli, Rohit Sharma from T20I series vs West Indies, now Team India will play 'baseball' cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.