मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्यावर शुक्रवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी क्रिकेट विश्वातील दिग्गजांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाडेकर यांचे पार्थिव शिवाजी पार्क जिमखाना येथे आणण्यात आले. "वाडेकर सर अमर रहे" अशा घोषणा देत चाहत्यांनी वाडेकर यांना अखेरचा निरोप दिला.
बुधवारी रात्री दीर्घ आजाराने जसलोक रुग्णालयामध्ये वाडेकर यांनी वयाच्या ७७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वाडेकर यांच्या अंत्यदर्शनासाठी माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. वरळी सी फेस येथील स्पोर्टसफील्ड अपार्टमेंट निवासस्थानी वाडेकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून क्रिकेट वर्तुळातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी वाडेकरांचे अंतिम दर्शन घेतले.
अंतिम निरोप वरळी येथून वाडेकरांचे पार्थिव शिवाजी पार्क जिमखाना येथे काही मिनिटांसाठी आणण्यात आले. वाडेकर यांनी ६ वर्षे शिवाजी पार्क जिमखानाचे अध्यक्षपद भूषविले होते. येथे त्यांना विशेष मानवंदना देण्यात आली, तसेच चाहत्यांनी ‘वाडेकर सर अमर रहे’, ‘जब तक सूरज चाँद रहेगा, अजित वाडेकर नाम रहेगा’ अशा घोषणा देत, वाडेकर यांना अंतिम निरोप दिला. यानंतर, शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये दुपारी २.१५ वाजता शासकीय इतमामात वाडेकर यांच्यावर विद्युतदाहिनीद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले. दिव्यांग खेळाडूंची उपस्थिती...अजित वाडेकर कायम दिव्यांग खेळाडूंचे आधार राहिले आहेत. १९८८ साली त्यांनी आॅल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर दी फिजिकल चॅलेंज्ड संस्थेची स्थापना करून, हजारो दिव्यांग खेळाडूंचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले. आपल्या या लाडक्या ‘कर्णधाराला’ अखेरचा निरोप देण्यासाठी शुक्रवारी मोठ्या संख्येने दिव्यांग खेळाडूंनी उपस्थिती दर्शविली होती. त्यांच्या जाण्याने आमचा आधार हरपला, अशी भावना दिव्यांग खेळाडूंनी व्यक्त केली.
भारतरत्न सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर, साबा करीम, विनोद कांबळी, संदीप पाटील, निलेश कुलकर्णी, पॅडी शिवलकर, वासू परांजपे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि दिव्यांग क्रिकेटपटू यांनी वाडेकर यांना श्रध्दांजली वाहिली.