भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 1996च्या विश्वचषकातला उपांत्य फेरीचा सामना कुणीही विसरू शकत नाही. कारण तो सामना आपण जिंकता जिंकता हरलो होतो. सचिन तेंडुलकर बाद झाला आणि चेंडू भिंगरीसारखा फिरायला लागला होता. भारताला हा सामना गमवावा लागला होता आणि याचे खापर संघाचे व्यवस्थापक अजित वाडेकर यांच्यावर फुटले होते. पण वाडेकर यांनी यावर थेट उत्तर दिलं होतं.
काय झाले होते आरोपभारताचा संघ पाकिस्तानला नमवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. आव्हान होते ते श्रीलंकेचे. या सामन्यात भारताने धावांचा पाठलाग करायचे ठरवले होते. हा निर्णय नंतर चुकीचा असल्याचे दिसून आले. धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय वाडेकर यांनी संघावर लादला होता, असा आरोप त्यांच्यावर झाला होता.
वाडेकर यांनी काय दिलं होतं उत्तरश्रीलंकेचा संघ चांगली फलंदाजी करत होता. कुठलेही आव्हान ते गाठू शकतात, असे सर्वांना वाटत होते. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा फलंदाजीला पाचारण करायचे, असे सर्वांनी मिळून ठरवले होते. मी संघाचा व्यवस्थापक होतो, पण हुकूमशाह नव्हतो. माझ्या एकट्याचा निर्णय संघ कसा स्वीकारेल याचा विचार करायला हवा. मी तो निर्णय संघावर लादला नव्हता, तो सर्वांनीच मिळून घेतला होता, असे वाडेकर म्हणाले होते.