जयपूर: अनिश्चिततेचा खेळ असं क्रिकेटला विनाकारण म्हटलं जात नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यात अनिल कुंबळेने एकाच डावात 10 विकेट घेऊन इतिहास रचला होता. त्यापूर्वी हा रेकॉर्ड जिम लेकरने 1956 साली केला होता. पण मर्यादीत षटकांच्या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला 10 विकेट घेता आलेल्या नाहीत.
मात्र, स्थानीक सामन्यांमध्ये राजस्थानच्या 15 वर्षीय आकाश चौधरीने सर्व 10 गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्याने एकही धाव न देता हा विक्रम केला. दिशा क्रिकेट अॅकेडमीकडून खेळताना डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आकाशने ही करामत केली. स्व. भवेर सिंह टी-20 टुर्नामेंटमध्ये पर्ल अॅकेडमी या संघाविरोधात खेळताना आकाशने हा विक्रम रचला आहे.
पर्ल अॅकेडमीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दिशा क्रिकेट अॅकेडमीला 20 षटकात त्यांनी 155 धावांत रोखलं. 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात पर्ल अॅकेडमीचा अख्खा संघ आकाश चौधरीच्या धारधार गोलंदाजीसमोर अवघ्या 36 धावांमध्ये गारद झाला. पहिल्या षटकात आकाशने दोन विकेट घेतल्या. दुस-या आणि तिस-या षटकात त्याने पुन्हा दोन विकेट घेतल्या. त्यानंतर आपल्या चौथ्या आणि अखेरच्या षटकात त्याने चार विकेट घेतल्या. याच षटकात त्याने हॅटट्रीकसुद्धा केली. 2002 मध्ये जन्मलेला आकाश हा राजस्थान-उत्तर प्रदेश सीमेजवळील भरतपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.