नवी दिल्ली : भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध घरच्या वन डे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2-1 ने विजय मिळवून यजमानांना पराभवाची धूळ चारली. खरं तर 3 सामन्यांच्या मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर बाद झाला. एकीकडे सूर्याच्या खराब खेळीवर प्रश्न उपस्थित होत असताना माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने सूर्याच्या समर्थनार्थ रोहित शर्मावर टीका केली आहे.
आकाश चोप्रानं रोहित शर्मावर फोडलं खापर
अखेरच्या वन डे सामन्यात सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर पाठवल्यामुळे आकाश चोप्राने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "अखेरच्या वन डे सामन्यात सूर्याने खेळणे योग्यच होते. पण त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणे हे योग्य नव्हते. जर तुम्हाला एखाद्याला पाठिंबा द्यायचा असेल आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही बोलले पाहिजे." एकूणच आकाश चोप्राने भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमारला गोल्डन डक मिळाले होते, त्यामुळे त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका
3 सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली होती. पण दुसऱ्या सामन्यात भारताचा दारूण पराभव करून कांगारूच्या संघाने 1-1 ने मालिकेत बरोबरी साधली. काल झालेल्या अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी विजय मिळवून मालिका खिशात घातली. भारतीय फलंदाजांना आलेले अपयश भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Akash Chopra has questioned captain Rohit Sharma saying that Suryakumar Yadav is right to play in the third ODI but why was he sent at number seven
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.