नवी दिल्ली : अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक पार पडला, ज्याचा किताब इंग्लिश संघाने पटकावला. त्यामुळे आता पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. जगातील सर्व संघ सध्या वेगवेगळ्या मालिका खेळत आहेत, भारतीय संघ देखील न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे पण अनेक खेळाडूंना येथे विश्रांती देण्यात आली आहे. खेळाडूंच्या सततच्या विश्रांतीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मावर निशाणा साधला आहे.
कर्णधाराशिवाय संघ कसा तयार होईल? आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर वर्कलोड मॅनेजमेंटबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड हे सर्व संघ खेळत असून त्यांचे नियमित कर्णधार खेळत असल्याचे त्याने सांगितले. जर सर्व संघांचे कर्णधार खेळत असतील तर आपल्या संघात इतके कर्णधार का बदलत आहेत, असा प्रश्नही त्याने विचारला. "संघ तयार करण्याची जबाबदारी कर्णधाराची असते, जर तुम्हाला खेळाडू तयार करायचे असतील तर कर्णधाराला तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे. पण जर वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे किंवा न्यूझीलंडमध्ये आपला कर्णधारच नसेल तर संघ कसा तयार होईल", अशा शब्दांत आकाश चोप्राने रोहितवर निशाणा साधला.
रोहितच्या विश्रांतीवर आकाश चोप्रा भडकलायाशिवाय रोहित शर्माला वनडे संघाचा कर्णधार बनवायचे असेल तर त्याने आयपीएलमधून विश्रांती घ्यायला हवी, कारण आता विश्रांती घेऊन विश्वचषकाच्या तयारीला खराब करू नये असे देखील चोप्राने म्हटले. खरं तर सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेत रोहितसह काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहली, लोकेश राहुल, भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्यात आली आहे. सध्या शिखर धवन भारताच्या वनडे संघाची धुरा सांभाळत आहे.