Join us  

आकाश मढवालचा दमदार ‘पंच’; केवळ ५ धावांत केला अर्धा संघ बाद

मुंबई इंडियन्सने डावात एकही अर्धशतक न झळकावता आयपीएल प्ले ऑफमध्ये सर्वोत्तम धावसंख्या रचली. मुंबईने सनरायझर्स हैदराबादची ६ बाद १७८ धावांची कामगिरी मागे टाकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 5:47 AM

Open in App

चेन्नई : संपूर्ण स्पर्धेत कमजोर गोलंदाजी म्हणून गणल्या गेलेल्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी मोक्याच्या वेळी दमदार कामगिरी केली. वेगवान गोलंदाज आकाश मढवालच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपरजायंट्सला ८१ धावांनी नमवत दुसऱ्या क्वालिफायर लढतीत प्रवेश केला. आकाशने लखनौचे कंबरडे मोडताना केवळ ५ धावा देत ५ बळी घेतले. मुंबईकर आता शुक्रवारी अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादमध्ये भिडतील. 

यासह मुंबईकरांनी पहिल्यांदाच लखनौला नमवण्याची कामगिरीही केली. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १८२ धावा उभारल्यानंतर लखनौला १६.३ षटकांत १०१ धावांमध्ये गुंडाळले. मार्कस स्टोइनिसचा अपवाद वगळता लखनौकडून कोणालाही झुंज देता आली नाही. लखनौकडून केवळ त्यानेच २० धावांचा पल्ला गाठला. मढवालने यंदाच्या सत्रातील सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवताना प्रेरक मांकड, आयुष बदोनी, निकोलस पूरन, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान यांना बाद केले. लखनौचा अर्धा संघ ७४ धावांमध्ये गारद करत मुंबईने सामन्यावर घट्ट पकड मिळवली.

त्याआधी, मधल्या फळीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर मुंबईने आव्हानात्मक मजल मारली.  नवीन उल हकने ४, तर यश ठाकूरने ३ बळी घेत मुंबईच्या फलंदाजीला हादरे दिले. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन आक्रमक फटकेबाजी करून पाठोपाठ बाद झाले. नवीनने मुंबईला पहिला धक्का देताना रोहितला बाद केले. परंतु, कॅमरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या गड्यासाठी ३८ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी करत मुंबईला सावरले. नवीनने ११व्या षटकात सूर्यासह ग्रीनलाही बाद करत मुंबईला दबावात आणले. मात्र, तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांच्या छोटेखानी फटकेबाजीमुळे मुंबईने चांगली धावसंख्या उभारली. टीम डेव्हिड आणि तिलक यांनी पाचव्या गड्यासाठी केलेली ३३ चेंडूंतील ४३ धावांची भागीदारीही महत्त्वाची ठरली.

महत्त्वाचे  आयपीएल पदार्पणात ४०० हून अधिक धावा काढणारा कॅमरून ग्रीन हा चौथा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला. याआधी, असा पराक्रम शॉन मार्श, शेन वॉटसन आणि ॲडम गिलख्रिस्ट यांनी केला आहे.     नवीन उल हक आयपीएलमध्ये ४ किंवा त्याहून अधिक बळी घेणारा लखनौचा पाचवा गोलंदाज ठरला.     नवीन उल हकने आयपीएलमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक गोलंदाजी केली.     मुंबई इंडियन्सने डावात एकही अर्धशतक न झळकावता आयपीएल प्ले ऑफमध्ये सर्वोत्तम धावसंख्या रचली. मुंबईने सनरायझर्स हैदराबादची ६ बाद १७८ धावांची कामगिरी मागे टाकली.      इशांत किशनने मुंबई इंडियन्सकडून २ हजार धावा पूर्ण केल्या. 

एक षटक, ३ हजार झाडेयंदाच्या आयपीएल प्ले ऑफमधील प्रत्येक निर्धाव चेंडूवर बीसीसीआयने ५०० झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. बीसीसीआयच्या या भन्नाट कल्पनेचे सर्वांनीच कौतुक केले. हा निर्णय घेतल्यापासून पहिले निर्धाव षटक लखनौ-मुंबई सामन्यात पडले. ख्रिस जॉर्डनने १६व्या षटकात टिच्चून मारा करत निर्धाव षटक टाकले. यासह या एका षटकातून बीसीसीआय तब्बल ३ हजार वृक्षांचे रोपण करेल.

 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्स
Open in App