नवी दिल्ली: न्यूझीलँड संघाला मायदेशात चीतपट केल्यानंतर भारतीय संघाचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळत आहे. मात्र, आताच्या घडीला क्रिकेट विश्वास घडत असलेल्या घडामोडींची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. यातच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने (Akshay Kumar) भारतीय संघातील दोन आवडत्या क्रिकेटपटूंची नावे सांगितली आहेत. अलीकडेच अक्षय कुमारला त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूंची नावे विचारण्यात आली होती.
दुखापतीमुळे जायबंदी झालेला रोहित शर्मा आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, विराट कोहलीच्या समावेशाबाबत साशंकता आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाची धुरा कोणाच्या हातात सोपवायची असा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे अक्षय कुमार याने आवडत्या खेळाडूंची नावे सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
विराट कोहली नाही, रोहित शर्माही नाही, मग कोण?
अक्षय कुमारने सध्याच्या संघातील त्याच्या आवडत्या भारतीय खेळाडूंची नावे सांगितली. सध्या माझे आवडते क्रिकेटपटू केएल राहुल आणि शिखर धवन आहेत, असे अक्षय कुमारने सांगितले. केएल राहुल तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. तर दुसरीकडे आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शिखर धवनला निवड समितीकडून संघात बोलावण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रोहित शर्माने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या तशी माहिती दिली आहे. सराव सत्रादरम्यान रोहितला दुखापत झाली आणि त्यामुळेच त्याला माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याजागी बीसीसीआयने गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचाळ याची कसोटी संघात निवड केली आहे. दुसरीकडे, विराट कोहली वन डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नाही खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे. बीसीसीआयने विराटकडून वन डे संघाचे कर्णधारपद काढून रोहितच्या खांद्यावर सोपवले होते.