लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेस्टर कूकचा मंगळवारी विशेष सन्मान करण्यात आला आणि तो इयान बॉथम यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. कूकने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि मंगळवारी त्याला नाइटहुड देऊन सन्मानित करण्यात आले. 2007 नंतर हा बहुमान मिळवणारा तो इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. कूकसह आतापर्यंत इंग्लंडच्या 11 खेळाडूंना गौरविण्यात आले आहे. बकिंघम पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात कूकचा सन्मान करण्यात आला.
34 वर्षीय कूकने गतवर्षी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर निवृत्ती स्वीकारली होती. ओव्हल कसोटीत कूकने शतकी खेळी करून क्रिकेटला अलविदा केले होते. कुकने कसोटी क्रिकेटमध्ये 12472 धाव केल्या आहेत आणि इंग्लंडचा तो सर्वात यशस्वी फलंदाज आहे. इंग्लंडकडून सर्वाधिक 33 शतकं, सर्वाधिक 161 सामने, सर्वाधिक 175 झेल आणि सर्वाधिक कसोटी 59 विजय मिळवण्याचा विक्रम कूकच्या नावावर आहे.