वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू असताना इंग्लंडचा महान कर्णधारांपैकी एक ॲलिस्टर कूकने ( Alastair Cook) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार कूक कौंटी क्रिकेट खेळत होता. पण सर ॲलिस्टर कुकने कौंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. २० वर्षांच्या कारकिर्दीत त्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटसह एकूण ५६२ सामने खेळले आणि ३४,०४५ धावा केल्या.
ॲलिस्टर कूकने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो म्हणाला, मी आता निवृत्ती घेत आहे आणि यासह माझी व्यावसायिक कारकीर्द संपुष्टात आली आहे. निरोप घेणे सोपे नव्हते. कारण दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याने मला अशा ठिकाणी जाण्याचा अनुभव दिला ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच संघांशी मैत्रीही झाली. माझ्या निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी मी नेहमीच माझे सर्वस्व दिले आहे, परंतु आता मला नवीन पिढीसाठी मार्ग मोकळा करायचा आहे.
ॲलिस्टर कूकने २००३ एसेक्सकडून इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केले. तेव्हापासून कुकने २० वर्षे कौंटी क्रिकेट खेळले. इंग्लंडसाठी त्याने १६१ कसोटी सामन्यांत १२४७२ धावा आणि ९२ वन डे सामन्यांत ३२०४ धावा आणि ४ ट्वेंटी-२०त ६१ धावा केल्या आहेत. कुकच्या नावावर कारकिर्दीत एकूण ३५२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २६६४३ धावा आहेत.१७८ लिस्ट ए सामन्यांमध्ये ६५१० धावा त्याने केल्या आहेत.