नागपूर : ‘भारताने एकाचवेळी वेगवेगळ्या देशात दोन संघ पाठविले तर अन्य संघांसाठी हा प्रयोग बोधप्रद ठरावा,’ असे गौरवोद्गार पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने काही आठवड्याआधी काढले होते. यासाठी त्याने बीसीसीआयचे कौतुकही केले. भारताने लवकरच हे साध्य करून दाखविले.
शिखर धवनच्या नेतृत्वात जुलैमध्ये श्रीलंका दौरा करणारा संघ गुरुवारी जाहीर झाला. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ आधीच डब्ल्यूटीसी फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तब्बल २५ वर्षानंतर बीसीसीआयने क्रिकेट विश्वावर पुन्हा वर्चस्व गाजविले आहे.
खेळाडू घडविण्याची प्रक्रिया आणि एकाहून एक सरस खेळाडूंची फळी निर्माण होणे याचे श्रेय स्थानिक क्रिकेटमधील भक्कम यंत्रणेला द्यावे लागेल. राहुल द्रविडसारख्या संयमी दिग्गजाने प्रशिक्षणाचा आणि आंतरराष्ट्रीय अनुभव देण्याचा पाया रचला. आयपीएलने खेळाडूंच्या प्रगतीची दारे उघडली. दोन संघांचा हा प्रयोग यशस्वी व्हावा, दोन्ही संघांनी दणदणीत विजय नोंदवावेत, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
१९९८ चा तो प्रसंग...- इतिहासात डोकावले तर भारताने १९९८ ला देखील असेच दोन संघ पाठविल्याचे उदाहरण डोळ्यापुढे येते. इंझमाम त्या क्षणांचा साक्षीदार आहे. भारताचा मूळ संघ पाकिस्तानविरुद्ध कॅनडात सहारा चषक खेळला, त्याचवेळी दुसरा संघ क्लालालम्पूर येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यावेळच्या संघ निवडीवर‘ मेडल विरुद्ध मनी’ अशी टीकाही झाली होती. राष्ट्रकुलसाठी तगडा संघ पाठविण्यात यावा अशी चाहत्यांची मागणी होती, तर बीसीसीआयला भारत- पाक लढतीतील पुरस्कर्त्यांना खूश करायचे होते. आयओएसोबतच्या निरर्थक चर्चेअंती बीसीसीआयने मूळ संघातील अर्धे खेळाडू राष्ट्रकुलसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. अजय जडेजाच्या नेतृत्वात क्वालालम्पूरला तर मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखालील संघ टोरोंटोला पाठविण्यात आला.- जडेजाच्या नेतृत्वाखालील संघ सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळे यांचा तसेच अझहरच्या नेतृत्वाखालील संघात सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि जवागल श्रीनाथचा समावेश होता. पाकनेदेखील राष्ट्रकुलमध्ये संघ पाठविला मात्र त्यांनी टोरोंटोसाठीच्या संघाला झुकते माप दिले.
सचिन, जडेजावर पाकचा आक्षेप- भारत आणि पाकिस्तान संघ राष्ट्रकुल स्पर्धेच्या साखळी सामन्यातच बाहेर पडले होते. टोरोंटोतही पाच सामन्यांच्या मालिकेत अझहरच्या नेतृत्वात भारतीय संघ पाककडून १-२ असा माघारला होता. त्याचवेळी अखेरच्या दोन सामन्यांसाठी सचिनला पाठविण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला. - सचिनच्या खेळण्यावर रमीझ राजासह अनेक खेळाडूंनी आक्षेपही नोंदविला होता. मोठ्या रस्सीखेचीनंतर सचिन आणि जडेजा यांना संघात घेण्यास पाकने होकार दिला.- जडेजा चौथ्या सामन्यात खेळला मात्र भारत हरला. खंडाळा येथे सुटी घालवीत असलेल्या सचिनने पाचव्या सामन्यात ७७ धावांची खेळी केली खरी तरीही पाकने सामना जिंकून मालिका ४-१ अशी खिशात घातली होती.