आगामी काळात फ्रँचायझी लीग या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर भारी पडणार, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचे अनेक खेळाडू जगभर फिरतात, परंतु त्यांना राष्ट्रीय कर्तव्यासाठी वेळ नसतो आणि आज त्यांच्या क्रिकेटची अवस्था कशी झालीय, हे आपण पाहतोच. त्यात आज इंग्लंडच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य ॲलेक्स हेल्सने वयाच्या ३४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये MCG येथे पाकिस्तानवर पाच विकेटने विजय मिळवून इंग्लंडकडून शेवटचा सामना खेळला होता.
हेल्स गेल्या नऊ महिन्यांपासून इंग्लंडच्या व्यवस्थापनाशी नियमित चर्चेत आहे आणि राष्ट्रीय वचनबद्धता व फ्रँचायझी करार यांच्यातील समतोल साधत आहे. जगभरातील फ्रँचायझी लीगसाठी त्याच्या सतत उपलब्धतेची पुष्टी करून त्याने आंतरराष्ट्रीय खेळातून बाहेर पडण्याचा पर्याय निवडला आहे. हेल्स म्हणाला, “तिनही फॉरमॅटमध्ये १५६ वेळा माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक विशेष आहे. मी काही आठवणी आणि काही मैत्री आयुष्यभर टिकवल्या आहेत आणि मला वाटते की आता पुढे जाण्याची योग्य वेळ आहे. संपूर्ण प्रवासात इंग्लंडच्या शर्टमध्ये मी काही सर्वोच्च आणि काही सर्वात खालच्या स्तरांचा अनुभव घेतला आहे. हा एक अविश्वसनीय प्रवास आहे आणि मला खूप समाधान वाटते की इंग्लंडसाठी माझा शेवटचा सामना वर्ल्ड कप फायनल होता आणि जो आम्ही जिंकला होता."
हेल्सने चार वर्षांपूर्वी इंग्लंडकडून शेवटचा वन डे सामना खेळला होता आणि भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा संघात समावेश होण्याची शक्यता कमीच आहे. पण, पुढच्या वर्षी कॅरेबियन व अमेरिका येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातील तो प्रबळ दावेदार होता. मात्र, त्याच्या निवृत्तीमुळे विल जॅक्स व फिल सॉल्ट या युवा खेळाडूंसाठी ट्वेंटी-२० संघातील संधी निर्माण झाली आहे.