नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालत आहे. आक्रमक फलंदाजी करून पुजाराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. इंग्लंडमध्ये रॉयल लंडन वनडे कपचा (Royal London One Day Cup) थरार रंगला असून तिथे अनेक विदेशी खेळाडू आपली छाप सोडत आहेत. आता सॉमरसेटविरूद्धच्या (Somerset vs Sussex) सामन्यात कर्णधार पुजाराने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र या सामन्यात पुजाराच्या सहकाऱ्याने आक्रमक फलंदाजी करून सर्वांनाच आकर्षित केले. ससेक्सच्या (Sussex) संघाचा सलामीवीर फलंदाज अली ओररने (Ali Orr) या सामन्यात १६१ चेंडूत २०६ धावांची खेळी करून दुहेरी शतक झळकावले आहे.
अली बनला ३५ वा खेळाडू
अली आणि पुजारा यांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर ससेक्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांमध्ये ५ बळी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात सॉमरसेटचा संघ अवघ्या १९६ धावांवर सर्वबाद झाला. ससेक्सने २०१ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. लक्षणीय बाब म्हणजे अली वनडे कप क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा ३५ वा खेळाडू बनला आहे. २१ वर्षीय अलीने आपल्या खेळीत ११ षटकार आणि १८ चौकार मारून धावांचा पाऊस पाडला. ही खेळी करत अलीने कर्णधार पुजाराला देखील मागे टाकले आहे. याआधी ससेक्सच्या खेळाडूच्या नावावर सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम पुजाराच्या नावावर होता. त्याने ५ दिवसांपूर्वी सरेविरुद्ध १७४ धावा केल्या होत्या.
पुजारा आणि अली यांच्यामधील भागीदारी
ससेक्सच्या संघाची सुरूवात हवी तशी शानदार झाली नव्हती कारण संघाने अवघ्या ६१ धावांवर आपले २ गडी गमावले होते. मात्र त्यानंतर कर्णधआर पुजारा आणि अली यांनी १४० धावांची महत्त्वाची भागीदारी नोंदवून सॉमरसेटच्या गोलंदाजांना घाम फोडला. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीत देखील ससेक्सच्या संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले. फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर ससेक्सच्या गोलंदाजांनीही अप्रतिम कामगिरी करत सॉमरसेटला २०० धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही. ब्रॅडली आणि जेम्स कोल्सने प्रत्येकी ३ बळी घेतले. त्याचवेळी हेन्री क्रोकोम्बेने ३१ धावा देऊन २ बळी पटकावले.
Web Title: Ali Orr hit 11 sixes and 18 fours to score a double century in the royal london one day cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.