सुनील गावस्कर लिहितात...
आॅस्ट्रेलियाविरुद्ध सध्याच्या मालिकेत हुकूमाचे सर्वच पत्ते भारताच्या हातात असल्याची माझी भावना आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात फलंदाज दमदार कामगिरी करीत आहेत, तर दुसरीकडे गोलंदाजही पाहुण्यांसाठी कर्दनकाळ ठरले. वॉर्नर आणि स्मिथ हे धावा काढण्यात अपयशी ठरले की आॅस्ट्रेलिया विजयाच्या निकट पोहोचू शकत नाही. ईडनवर शंभराव्या सामन्यात स्मिथने अर्धशतकी खेळी केली खरी, पण संघाला तो विजय मिळवून देऊ शकला नव्हता.
आघाडीच्या फलंदाजांकडूनही चांगली सुरुवात मिळत नसल्याने आॅस्ट्रेलियन फलंदाजांचा संघर्ष सुरू होतो. उभय संघांच्या गोलंदाजीत समानता असली तरी भारताकडे चेंडू वळविणारे दोन फिरकीपटू आहेत. याउलट नाईल आणि कमिन्स यांनी वर्चस्व जरी गाजविले तरी ते टिकवून ठेवणारा अन्य कुणी गोलंदाज आॅस्ट्रेलियाकडे नाही.
उकाडा आणि हवेतील दमटपणा हे लक्षात घेता सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना किती षटके गोलंदाजी द्यायची याचा विचार स्मिथला आता नक्की करावा लागेल. चहल- कुलदीप यांचा मारा आॅस्ट्रेलियासाठी आता भीतीदायक वाटू लागला आहे. कोहलीने ईडनवर कुलदीपकडे ज्या विश्वासाने चेंडू सोपविला व त्यातून त्याने घेतलेली ‘हॅट्ट्रिक’ हे युवा खेळाडूच्या धाडसाचे उत्तम उदाहरण ठरावे. इंदूरची खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक दिसते. यामुळेच आॅस्ट्रेलियन संघ अॅरोन फिंच याला खेळविण्याचा विचार करीत असावा. फिंच ‘गेम चेंजर’ बनू शकतो. त्याच्याकडे भारतात खेळण्याचा अनुभव आहे.
त्याने वॉर्नरला चांगली सुरुवात करण्यास सहकार्य केल्यास आॅस्ट्रेलियाची वाटचाल सोपी होईल. अशावेळी भारताला संघर्ष करावा लागू शकतो. रोहित शर्माने देखणी फटकेबाजी करीत प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणावे, अशी भारताची देखील इच्छा असेल. (पीएमजी)
रहाणे आणि कोहली फॉर्ममध्ये आहेतच. रोहितने बहारदार फटकेबाजी केल्यास होळकर स्टेडियमवर चाहत्यांचे भरपूर मनोरंजन होईल.
आॅस्ट्रेलियासाठी इंदूरचा सामना‘ करा किंवा मरा’ असा झाला आहे. पाहुण्यांचा येथे पराभव म्हणजे मालिका हातून जाणे. त्यामुळे मालिका वाचविण्यासाठी संघर्षावाचून पर्याय नाही, हे स्मिथ अॅन्ड कंपनीने ध्यानात ठेवावे.
Web Title: All the commands of the order are in India's hand, as well as the strong performance of the batsmen under the leadership of Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.