साऊदम्पटन : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या यशाचे श्रेय भारतीय व आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीला दिले आहे. समालोचक हर्षा भोगलेसोबत एका वृत्तसंस्थेसोबत केलेल्या संक्षिप्त चर्चेत सिराजने सांगितले की, २०१८ व २०१९ च्या आयपीएल मोसमात माझी कामगिरी विशेष नव्हती.
फ्रँचायझी मला रिलिज तर करणार नाही ना, अशी भीती वाटत होती. त्यावेळी विराटने त्याचे मनोधैर्य उंचावले होते. सिराज सांगतो,‘विराट म्हणाला होता, की सिराज तू काहीही कर. शकतो. तू तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर. त्यामुळे मी आज जे काही आहो ते विराट भय्यामुळे आहे.’सिराजने एका आठवणीला उजाळा देताना सांगितले की ज्यावेळी भारतातर्फे खेळण्यासाठी बीसीसीआयचा मला फोन आला होता त्यावेळी कोहली माझ्या समोरच बसला होता. मी १५-२० मिनिट कोहलीला बघत राहिलो. कारण त्याच्यासोबत खेळण्याची संधी मिळणार होती.
सिराजने हैदराबादमधील संघाच्या डिनरची आठवणही काढली. ज्यावेळी त्याचा संघ इंदूरमध्ये सनरायझर्सविरुद्ध आयपीएल लढत खेळून हैदराबादला आला होता. हैदराबाद सिराजचे गृहनगर आहे. सिराजने त्यावेळी विराटला म्हटले की, मी संघाला डिनरसाठी निमंत्रित करण्यास इच्छुक आहो. येशील ना. कोहली म्हणाला होता, का नाही, पण पाठदुखीमुळे विराट डीनरला जाऊ शकला नव्हता. त्यानंतर ज्यावेळी तो सिराजच्या घरी गेला त्यावेळी त्याने त्याची गळाभेट घेतली. सिराजने त्याच्यासाठी भोजन ठेवले होते, पण फिटनेसबाबत जागरुक असलेल्या विराटने निवडक व्यंजनाचा स्वाद घेतला. सिराजच्या मते विराट भय्याचे येणेच त्याच्यासाठी महत्त्वाचे होते.
कोहली व रहाणेच्या नेतृत्वाची चर्चा करताना सिराज म्हणाला, विराट आक्रमक आहे तर रहाणे शांत आहे. बळी घेतल्यानंतर विराट ज्या उत्साहात जल्लोष साजरा करतो तेवढा जल्लोष बळी घेणारा गोलंदाजही करीत नाही.