Join us  

मोठी बातमी : २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार की नाही? रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'!

रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याच्या सहभागाविषयी मोठे अपडेट्स दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 4:36 PM

Open in App

भारतीय संघाच्या तिनही फॉरमॅटचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याच्या सहभागाविषयी मोठे अपडेट्स दिले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सध्या भारताचा ट्वेंटी-२० संघ युवा खेळाडूंची फौज घेऊन मैदान गाजवतोय. त्यामुळे रोहित व विराट कोहली यांची ट्वेंटी-२० कारकीर्द संपली अशी चर्चा सुरू असताना अमेरिकेत एका कार्यक्रमाला गेलेल्या रोहितने मन की बात केली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. सलग दोन आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला जेतेपद पटकावता आले नाही. पण, भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत हा आयसीसी चषकाचा दुष्काळ संपेल अशी अपेक्षा आहे. रोहित आता ३६ वर्षांचा आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेनंतर हिटमॅनच्या ट्वेंटी-२०तून निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कॅरेबियन व अमेरिकेत होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ खेळेल असा दावा केला जातोय

.पण, सध्या अमेरिकेतच असलेल्या रोहितने यावर परखड मत मांडले. आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पुढच्या वर्षी अमेरिकेत येण्याचा मानस त्याने व्यक्त केला. रोहित म्हणाला की, अमेरिकेत येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पुढील वर्षी येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. ज्यासाठी आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत. आपण सर्वजण २०२४ च्या  वर्ल्ड कपची वाट पाहत आहोत. त्यामुळे आम्ही येथे येण्यास उत्सुक आहोत.  

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी गेल्या वर्षी २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर एकही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. या दोन्ही खेळाडूंना केवळ वन डे वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रित करू द्यायचे आहे. रोहितने आता त्यावर आपले इरादे स्पष्ट केले असतील.  

"या क्षणी मला वाटते की हे आमच्यासाठी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वर्ष आहे आणि काही खेळाडूंना सर्व फॉरमॅट खेळणे शक्य नाही. जर तुम्ही वेळापत्रक बघितले तर बॅक टू बॅक सामने आहेत आणि  त्यामुळे आम्ही काही खेळाडूंच्या कामाचा ताण बघून त्यांना पुरेसा ब्रेक टाइम मिळावा असे ठरवले आहे. मी नक्कीच त्या (श्रेणी) मध्ये येतो," असे रोहितने पत्रकारांना सांगितले. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२रोहित शर्मा
Open in App