Rohit Sharma has been appointed as India's new ODI captain - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्वाची जबाबदारी सोडली अन् रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) अधिकृतपणे कर्णधारपद आलं. मर्यादित षटकांच्या संघांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार अशी क्वचितच घडणारी घटना टीम इंडियात होताना दिसत आहे. त्यामुळे आता विराटकडून वन डे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतली गेली असून रोहित शर्मा वन डे संघाचा नवा कर्णधार असणार आहे. 2011च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितला संघात स्थान मिळालं नव्हतं आणि 12 वर्षांनंतर तो 2023च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे.
रोहित शर्मानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेंटी-20 संघाच्या नेतृत्वाची पूर्णवेळ जबाबदारी स्वीकारली. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं किवींविरुद्धची मालिका 3-0 अशी जिंकली. त्यानंतर आता आफ्रिका दौऱ्यासाठीच्या कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसह त्याच्याकडे वन डे संघाचे नेतृत्वही सोपवले गेले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 95 वन डे सामन्यांत 65 विजय मिळवले आहेत, तर 27 पराभव पत्करले आहेत. त्यानं कर्णधार म्हणून 72.65च्या सरासरीनं 5449 धावाही केल्या आहेत.