IND vs ENG: भारतीय संघातील सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षकांना कोरोनानं गाठलेलं असताना भारतीय खेळाडूंच्या कोरोना चाचण्याच्या अहवालांची प्रतिक्षा लागून राहिली होती. अखेर भारतीय संघाच्या सर्व खेळाडूंचे कोरोना चाचणी अहवाल आले असून सर्वजण निगेटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे आणि उद्या निर्धारित वेळात मँचेस्टर कसोटी सामन्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर सपोर्ट स्टाफमधील आणखी एक सदस्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे भारतीय संघाचं आजचं सराव शिबीर देखील रद्द करण्यात आलं होतं. खेळाडूंना त्यांच्या रुमबाहेर पडण्यासही मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटीवर कोरोनाचं सावट होतं. खेळाडू सरावावेळी सपोर्ट स्टाफच्या संपर्कात येत असतात त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंच्या कोरोना चाचण्याच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर सर्व खेळाडूंचं अहवाल आता प्राप्त झाले आहेत.