नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे युद्धच. पण हा सामना जर विश्वचषकात खेळला जात असेल तर त्याला महायुद्धाचं स्वरुप प्राप्त होतं. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातही क्रिकेट जगताला हीच गोष्ट पाहायला मिळाली. विश्वचषकाची उपांत्य आणि अंतिम लढत चांगलीच रंगतदार झाली. पण विश्वचषकात सर्वात जास्त पाहिली गेली ती लढत म्हणजे भारत आणि पाकिस्तान.इंग्लंडमध्ये 16 जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यापूर्वी भारत पाकिस्तानशी खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता होती. पण भारताच्या सरकारने या सामन्याला परवानगी दिली आणि त्यानंतर बीसीसीआयने हा सामना खेळण्यास तयारी दाखवली.
आतापर्यंत विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्धचा एकही सामना गमावल नव्हता. त्यामुळे या सामन्यावर साऱ्यांच्या नजरा होत्या. हा सामना 10 कोटी 60 लाख लोकांनी लाईव्ह पाहिला. आतापर्यंत एवढी पसंती कोणत्याच सामन्याला मिळाली नव्हती, असे म्हटले जात आहे. भारताचा अजून एक सामना जास्त पाहिला गेला. तो सामना होता उपांत्य फेरीचा.
उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडचा सामना करावा लागला. हा सामना अखेरच्या षटकांपर्यंत रंगतदार झाला. रवींद्र जडेजाने या सामन्यात चांगलेच रंग भरले होते. पण भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि विश्वचषकातील त्यांचे आव्हान संपुष्टात आले. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात झालेला हा सामना 25 लाख तीस हजार लोकांनी फक्त हॉटस्टारवर पाहिला होता.