ठाणे : वरुण लवंडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजय शिर्के अकॅडमीने बेनेटन क्रिकेट क्लबचा ७० धावांनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित पालकमंत्री चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आव्हान कायम राखले.
दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृहात सुरु असलेल्या स्पर्धेत वरुणने तुफान फटकेबाजी करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. वरुणने नऊ चौकार आणि तीन षटकार मारत ७२ धावा केल्या. शेखर दळवीने ३० धावा केल्या. या दोघांच्या धावांमुळे विजय शिर्के अकॅडमीने २० षटकात ८ बाद १६७ धावा उभारल्या. या डावात अजय मिश्राने तीन, यासिन शेखने दोन आणि राहुल सोलकर, इम्रोझ खान, राकेश प्रभूने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
विजयाचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात बेनेटन क्रिकेट क्लबचा डाव सोळाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर ९७ धावांवर आटोपला. राकेश प्रभूने ३२ आणि निखिल पाटीलने २८ धावा करत बऱ्यापैकी लढत दिली. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही छाप पाडताना वरुणने दोन षटकात ९ धावा देत २विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय आशुतोष उपाध्याय, सुरेश पारडी आणि हार्दिक कुरंगळेनेही प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. अथर्व अंकोलेकर आणि वैभव बनेने प्रत्येकी एक विकेट मिळवली. वरुणला सामन्यातील स्टार खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
Web Title: All round performance of Varun Lavande, victory of Vijay Shirke Academy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.