Ranji Trophy 2022 : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात बुधवारी वेगळ्या विक्रमाची नोंद झाली. बंगाल विरुद्ध झारखंड या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हा विक्रम नोंदवला गेला आणि प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 250 वर्षांच्या इतिहासात असे प्रथमच घडले. प्रथम फलंदाजी करताना बंगालने 7 बाद 773 धावांवर पहिला डाव घोषित केला. सुदीप कुमार घरमी ( Sudip Kumar Gharami ) आणि अनुस्तूप मझुमदार ( Anustup Majumdar ) यांच्या शतकी खेळीने झारखंडच्या गोलंदाजांना हतबल केले. पण, या दोघांव्यतिरिक्त अन्य 7 फलंदाजांनीही दमदार खेळी करून संघाचे नाव विक्रमांच्या यादीत नोंदवले. 9 फलंदाजांच्या जोरावर बंगालने आज असा पराक्रम नोंदवला जो याआधी कधी घडला नव्हता आणि पुन्हा कधी घडेल याची शक्यताही कमीच वाटते.
अभिषेक रमण व कर्णधार अभिमन्यू ईस्वरन यांनी पहिल्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली. अभिषेकने 109 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारासह 61 धावा केल्या, तर अभिमन्यूने 124 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 65 धावा केल्या. या दोघांच्या दमदार सुरूवातीनंतर सुदीप व अनुस्तूप यांची बॅट तळपली. सुदीपने 380 चेंडूंत 21 चौकार व 1 षटकार खेचून 186 धावा केल्या. अनुस्पूपनेही 194 चेंडूंत 117 धावांची खेळी केली आणि त्यात 17 चौकार खेचले. त्यापाठोपाठ मनोज तिवारी ( 73), अभिषेक पोरेल ( 68), शाहबाद अहमद ( 78), सयान मोंडल (53*) व आकाश दीप ( 53*) यांनी अर्धशतक झळकावली. आकाश दीपने 18 चेंडूंत 8 षटकारांच्या मदतीने 53 धावा कुटल्या. त्याने 53 पैकी 48 धावा या केवळ षटकारांनी केल्या.
रणजी करंडक क्रिकेटमध्ये आघाडीच्या 9 फलंदाजांनी 50+ धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 250 वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हे प्रथमच घडले