पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता इंझमाम-उल-हकने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तो मागील काही कालावधीपासून मुख्य निवडकर्ता म्हणून पाकिस्तानी संघात खेळाडूंना संधी देत होता. घराणेशाही आणि जवळच्यांनाच संधी दिल्याचा आरोप झाल्याने त्याने तडकाफडकी राजीनामा दिला. "लोक कोणत्याही आधाराशिवाय बोलतात. माझ्यावर प्रश्न उपस्थित केले गेले, त्यामुळे मी राजीनामा देणे चांगले आहे असे मी ठरवले," असे इंझमामने जिओ न्यूजच्या वृत्तानुसार एका निवेदनात म्हटले आहे.
विद्यमान पाकिस्तानी संघात इंजमामच्या जवळचे सहकारी असल्याने तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. खरं तर पाकिस्तानला यंदाच्या वन डे विश्वचषकात खास कामगिरी करता आली नाही. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाने सुरूवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर सलग चार सामने गमावले आहेत. पाकिस्तानला अफगाणिस्ताविरूद्ध देखील पराभव स्वीकारावा लागल्याने जाणकारांसह पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी इंजमामला लक्ष्य केले. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक आणि शादाब खान हे इंजमामचे नातेवाईक आहेत. इमाम त्याचा भाचा आहे तर शादाब जावई आहे. म्हणूनच मुख्य निवडकर्ता पदाचा गैरवापर करत इंजमाम यांना संधी देत असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, इमाम-उल-हकला साजेशी खेळी करण्यात यश आले असले तरी त्याचा स्ट्राईक रेट संघाची डोकेदुखी वाढवणारा आहे. तर, शादाब खान अष्टपैलू म्हणून संघात आहे पण त्याला बॉल आणि चेंडू दोन्ही बाजूंनी अपयश आले. एका सामन्यात तर शादाबला वगळण्यात देखील आले होते.