भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानं विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. विराटनं नेहमी १०० टक्के योगदान दिले आहे, असे सचिन म्हणाला. विराटनं शनिवारी टीम इंडिायाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. ३३ वर्षीय कोहलीनं मागील वर्षी ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आणि त्यानंतर त्याला वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत २-१ असा पराभव पत्करल्यानंतर २४ तासांत विराटनं हा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
७ वर्षांच्या या कर्णधारपदाच्या प्रवासात भारतीय संघाला त्यानं आयसीसी क्रमवारीत ७व्या क्रमांकावरून थेट अव्वल क्रमांकावर आणून बसवलं. म्हणूनच या यशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या प्रत्येकाचे विराटनं आभार मानले. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून फलंदाजीतील विक्रम पाहता त्यानं ११३ डावांमध्ये ५४.८०च्या सरासरीनं ५८६४ धावा केल्या आहेत आणि त्यात २० शतकं व १८ अर्धशतकांचा समावेश आहे. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून विराट अव्वल स्थानी आहे. त्यानं ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले आहेत. महेंद्रसिंग धोनीनं ६० पैकी २७ आणि सौरव गांगुलीनं ४९ पैकी २१ सामने जिंकले आहेत.
कोहलीच्या निर्णयावर सचिन तेंडुलकर म्हणाला, कर्णधार म्हणून तुझ्या यशस्वी कारकीर्दिचे अभिनंदन... तू संघासाठी नेहमी १०० टक्के योगदान दिले आहेस आणि यापुढेही देशील. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.