alyssa healy WPL । मुंबई : महिला प्रीमिअर लीगचा (WPL 2023) पहिला हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या हंगामात आरसीबीच्या (RCB) संघाला केवळ 2 सामन्यात विजय मिळवता आला. आरसीबीच्या संघाने साखळी फेरीतील 8 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला, तर 6 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. खरं तर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अंतिम फेरी गाठली आहे, तर यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज एलिमिनेटरचा सामना होणार आहे. मुंबई आणि यूपी यांच्यातील विजेता संघ 26 तारखेला दिल्लीसोबत फायनल खेळेल.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी ॲलिसा हिली महिला प्रीमिअर लीगमध्ये यूपी वॉरियर्सच्या संघाचे नेतृत्व करत आहे. आज ॲलिसा हिलीचा वाढदिवस असून पती मिचेल स्टार्कने यूपीच्या कॅम्पमध्ये जाऊन पत्नीचा वाढदिवस साजरा केला.
तसेच ॲलिसा हिलीने मुंबईची ओळख असलेल्या वडापावचा देखील आस्वाद घेतला. ऑस्ट्रेलियन खेळाडूला वडापावची पडलेली भुरळ क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. आज महिला प्रीमिअर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात ॲलिसा हिली आणि हरमनप्रीत कौर आमनेसामने असणार आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाने साखळी फेरीतील 8 पैकी 6 सामने जिंकून इथपर्यंत मजल मारली आहे, तर ॲलिसा हिलीच्या नेतृत्वातील यूपीचा संघ 8 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह एलिमिनेटर सामन्यासाठी पात्र ठरला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"