ब्रिजटाऊन - इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षणावरून कर्णधार शाय होप याच्या निर्णयाबाबत सार्वजनिक स्वरूपात असहमती व्यक्त केल्याबद्दल क्रिकेट वेस्ट इंडिजने वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याला दोन सामन्यांसाठी निलंबित केले आहे.
वेस्ट इंडिजने बुधवारी झालेल्या या लढतीत आठ गडी राखून विजय मिळवताना मालिका जिंकली. सामन्यादरम्यान जोसेफने क्षेत्ररक्षणावरून विरोध केला होता आणि काही वेळासाठी मैदान सोडून बाहेर गेला. जोसेफ आणि होप यांच्यात चौथ्या षटकाआधी बराच वेळ वाद झाला.
परिस्थिती अशी होती की, पंचांना खेळ पुन्हा सुरू करण्याची विनंती करावी लागली. या षटकात एक चेंडू ऑफ साइडला खेळला गेल्यानंतर जोसेफ होपवर चिडला. षटक पूर्ण झाल्यानंतर हा वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर गेला आणि काही वेळाने पुन्हा मैदानावर आला.
विंडीज बोर्डाचे क्रिकेट निदेशक माइल्स बास्कोम्बे यांनी सांगितले की, अल्झारीने शिस्त मोडली. अशा वर्तनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही ही कारवाई करत आहोत.