ख्राईस्टचर्च, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका : मेलबर्नवर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाची दमछाक उडवली असताना न्यूझीलंडमध्ये सुरु असलेला दुसरा बॉक्सिंग डे कसोटी सामनाही रंगतदार अवस्थेत आहे. यजमान न्यूझीलंडचा पहिला डाव 178 धावांवर गुंडाळणाऱ्या श्रीलंकेला चांगलाच धक्का बसला आहे. ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर लंकन फलंदाजानी शरणागती पत्करली. बोल्टने अवघ्या 15 चेंडूंत लंकेच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवण्याचा पराक्रम केला.
पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखणाऱ्या श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत उत्तम गोलंदाजी केली. लकमल ( 5/54) आणि कुमारा ( 3/49) यांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने किवींचा पहिला डाव 178 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात श्रीलंका मोठी आघाडी घेईल असे वाटत होते. मात्र, त्यांचे चार फलंदाज अवघ्या 51 धावांवर माघारी फिरले. ॲंजेलो मॅथ्यूज आणि रोशन सिल्वा यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या जोडीला बोल्टची नजर लागली. बोल्टने सिल्वाला झेलबाद करून माघारी धाडले. त्यानंतर बोल्टने पुढील 10 धावांत श्रीलंकेचा संपूर्ण संघ माघारी पाठवला. बोल्टने अवघ्या 15 चेंडूंत सहा विकेट घेत श्रीलंकेचा पहिला डाव 104 धावांत गुंडाळला. विशेष म्हणजे बोल्टने तळाच्या चारही फलंदाजांना भोपळाही फोडू न देता पायचीत केले. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता शतकी पल्ला ओलांडला आहे. पाहा व्हिडीओ...