नवी दिल्ली, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : मुंबईतील सामना जिंकत भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि निर्णायक सामना तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. आज भारतीय संघाचे तिरुवनंतपुरम येथे मोठ्या दिमाखात आगमन झाले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय मालिकेत भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने सलग दुसरे शतक झळकावले. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा सर्वात जलद पूर्ण करण्याचा विक्रमही केला. पण या सामन्यात भारताला विजय मिळवता आला नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर पुणे येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली होती. पण मुंबईत रोहित शर्माने साकारलेल्या दीडशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी पुन्हा एकदा आघाडी मिळवली.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि निर्णायक सामना तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिका जिंकता येईल. पण वेस्ट इंडिजने जर हा सामना जिंकला तर मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटू शकते.
तिरुवनंतपुरममध्ये आज भारताचा संघ दाखल झाला. चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी खास पारंपरिक ढोल वाजवत भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले.