नवी दिल्ली : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा हिस्सा राहिलेल्या अंबाती रायुडूने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला रायुडूने हे जाहीर केले होते. यंदाच्या हंगामाचा किताब सीएसकेने पटकावल्यानंतर धोनीने ट्रॉफी उंचावण्याचा मान रायुडूला दिला आणि सर्वांची मनं जिंकली. रायुडूने आयपीएल २०२३ मध्ये निवृत्ती घेतली, तर आधीच निवृत्त झालेला ड्वेन ब्राव्हो या हंगामात संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता.
दरम्यान, रायुडू आणि ब्राव्हो यांच्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आयपीएल २०२३ चे जेतेपद पटकावले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या शिलेदारांनी पाचव्यांदा ही किमया साधली. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर ब्राव्हो जगभरातील इतर अनेक ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळताना दिसला आहे, परंतु रायुडू प्रथमच देशाबाहेरील ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळणार आहे. खरं तर रायुडू आणि ब्राव्हो या वर्षी अमेरिकेत खेळल्या जाणार्या 'मेजर लीग क्रिकेट'मध्ये एकत्र खेळताना दिसणार आहेत.
रायुडू आणि ब्राव्हो एकाच संघातरायुडू आणि ब्राव्हो हिस्सा असलेल्या संघाचे नाव 'टेक्सास सुपर किंग्स' आहे, ज्याला आयपीएल फ्रँचायझी CSK ने विकत घेतले आहे. रायुडू आणि ब्राव्हो व्यतिरिक्त डेव्हॉन कॉनवे आणि मिचेल सँटनर हे देखील मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात टेक्सास सुपर किंग्जकडून खेळणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे मेजर लीग क्रिकेटचा हा पदार्पणाचा हंगाम आहे. या स्पर्धेला १४ जुलैपासून सुरूवात होत आहे.