कोरोना व्हायरसच्या संकटात देशातील रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख 79,162 इतकी झाली आहे. त्यापैकी 5 लाख 54,429 रुग्ण बरे झाले असून 23,187 जणांना प्राण गमवावे लागले आहे. या संकटात क्रिकेट स्पर्धाही रद्द असल्यानं खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्यायला मिळत आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना हे आपापल्या मुलांसह फुल धम्माल मस्ती करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता त्यात आणखी एका भारतीय फलंदाजाची भर पडली आहे.
भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्स संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू याच्या घरी नन्ही परी आली आहे. चेन्नई सुपर किंग्सनं सोशल मीडियावर ही गोड बातमी सांगितली. अंबाती रायुडू आणि त्याची पत्नी चेन्नुपल्ली विद्या यांना 12 जुलैला कन्यारत्न प्राप्ती झाली. CSKनं ट्विट केलं की,''आता डॅडी आर्मीकडून तुला ऑफ-फिल्ड धडे शिकून घ्यावे लागतील.''