आपल्या तापट स्वभावासाठी ओळखला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडू नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने राजकारणात पाऊल ठेवले होते. मात्र, तूर्तास राजकारणातून बाहेर पडत असल्याचे सांगून त्याने सर्वांचे लक्ष वेधले. अंबाती रायुडूने युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टीमध्ये (YSRCP)) सामील झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी पक्ष सोडला आणि चाहत्यांना धक्का बसला.
रायुडूने आता राजकीय क्षेत्रातून अचानक माघार घेण्यामागचे कारण उघड केले आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "मी येत्या २० जानेवारीपासून दुबई येथे होणाऱ्या ILt20 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे प्रोफेशनल खेळ खेळताना मला कोणत्याही राजकीय पक्षासोबत असणे योग्य वाटत नाही. त्यामुळे मी राजकारणापासून दूर झालो आहे."
दरम्यान, १९ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान UAE ILT20 चा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा दुबई, अबू धाबी आणि शारजाह या तीन प्रमुख ठिकाणी होणार आहे. रायुडूने त्याच्या नव्याने सुरू केलेल्या राजकीय प्रवासात त्याच्या क्रिकेट बांधिलकींना प्राधान्य दिले. ३६ वर्षीय रायुडूने वायएसआरसीपीमध्ये सामील झाल्यानंतर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते.
रायुडूची क्रिकेट कारकीर्दअंबाती रायुडूला फार कमी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. ३६ वर्षीय रायडूने आयपीएल २०२३ नंतर जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२ लीगला रामराम केला. रायुडू शेवटचा आयपीएल हंगाम महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाकडून खेळला होता. अंबाती रायुडूने भारतासाठी ५५ वन डे सामन्यांमध्ये १६९४ धावा केल्या आहेत. नाबाद १२४ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याने ३ शतके आणि १० अर्धशतकेही झळकावली आहेत. याशिवाय, रायुडूने ६ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये केवळ 42 धावा केल्या.