नवी दिल्ली : क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयपीएल २०२३ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा हिस्सा होता. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला रायुडूने आयपीएलमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. आयपीएल २०२३ चा किताब उंचावल्यानंतर तो आता प्रथमच माध्यमांसमोर आला आहे. बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी आपल्या मुलाचे करिअर घडवण्यासाठी आपली कारकीर्द उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप रायुडूने केला आहे. त्याने माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
माजी क्रिकेटर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शिवलाल यादव यांच्यामुळे मी टीम इंडियासाठी जास्त काळ खेळू शकलो नाही. शिवलाल यादव यांनी आपल्या मुलाचे करिअर घडवण्यासाठी मला मागे खेचले, असा खुलासा रायुडूने केला आहे. तो टीव्ही ९ तेलुगू या वृत्तवाहिनीशी बोलत होता. "मी लहान असताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये राजकारण सुरू झाले होते. शिवलाल यादव यांचा मुलगा अर्जुन यादव याला भारतीय संघात खेळवण्यासाठी मला त्रास दिला गेला. मी अर्जुन यादवपेक्षा चांगला खेळत होतो, त्यामुळेच त्यांनी मला मागे खेचण्याचा प्रयत्न केला", असे रायुडूने सांगितले.
शिवलाल यादव यांच्यावर निशाणा तसेच २००३-०४ मध्ये मी भारत अ संघासाठी चांगली कामगिरी केली होती. पण २००४ मध्ये निवड समिती बदलली आणि शिवलाल यादव यांच्या जवळचे लोक त्यात सामील झाले, त्यामुळे मला संधी मिळाली नाही. ४ वर्षे त्यांनी माझ्याशी कोणाला बोलू देखील दिले नाही. शिवलाल यादव यांच्या लहान भावाने मला शिवीगाळही केली. त्यांनी माझा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक खुलासा रायुडूने केला.
रायुडूचा मोठा खुलासा दरम्यान, "संघातील इतर खेळाडू माझ्याशी बोलले नाहीत. जे बोलत होते त्यांना संघातून बाहेर फेकले गेले. त्यावेळी माझ्याशी खूप भेदभाव केला गेला. चांगली कामगिरी करण्यासाठी क्रिकेटपटूने खेळासोबतच मानसिकदृष्ट्याही तंदुरूस्त असायला हवे. पण त्यावेळी मी खूप तणावाखाली होतो. म्हणूनच मला हैदराबाद सोडून आंध्र प्रदेशात जावे लागले", असे माजी खेळाडूने अधिक सांगितले.
खरं तर अंबाती रायुडूला २०१९ च्या विश्वचषक संघातून शेवटच्या क्षणी वगळण्यात आले होते. यावर भाष्य करताना त्याने सांगितले की, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला विश्वचषकाची तयारी करण्यास सांगितले होते. पण त्यावेळी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी रायुडूऐवजी विजय शंकरला पसंती दिली. यानंतर रायुडूने थ्रीडी ट्विट केले, जे चर्चेचा विषय बनले होते.