Ambati Rayudu Retirement Tweet, IPL 2022: यंदाच्या मोसमात महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ची अवस्था सुरुवातीपासूनच वाईट आहे. आता हा संघ 'प्ले ऑफ'मधूनही बाहेर पडला आहे. चेन्नई संघात अंतर्गत कुरबुरी असल्याच्या चर्चाही चांगल्याच जोर धरू लागल्यात. संघाच्या नेतृत्वाची धुरा स्पर्धेच्या सुरूवातीला रवींद्र जाडेजाकडे होती, पण हंगामाच्या मध्यावर त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले.
चेन्नईच्या संघातील अंतर्गत कुरबुरी इथेच थांबल्या नाहीत. त्यानंतर शनिवारी अचानक मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने ट्विट करून खळबळ उडवून दिली. रायडूने १४ मे रोजी अचानक ट्विट करून IPL मधून निवृत्ती जाहीर केली. लोकांना काही समजण्याआधीच रायडूने ते ट्विट डिलीटही केले. त्यामुळे तर रायडूच्या या कृतीची अधिकच चर्चा रंगली.
यावर, चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी माहिती दिली की, 'रायडूने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करणे ही चुकीची बातमी आहे. त्याने हे ट्विट मागे घेतले असून तो निवृत्त होत नाहीये.' त्यातच आता या प्रकरणी चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही मोठे वक्तव्य केले. पत्रकार परिषदेत रायडूबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फ्लेमिंग म्हणाले, "संघासाठी ही एक निराशाजनक गोष्ट असू शकली असती. पण हा गोंधळ फक्त थोड्या काळासाठी झाला. अंबाती रायडू सध्या अगदी ठणठणीत आहे. CSKच्या कॅम्पमध्ये काहीच अडचण नाही."
दरम्यान, रायुडूने चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत 12 सामने खेळले असून त्यात 271 धावा केल्या आहेत.