मुंबई : भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूनं बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. अंबाती रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने वर्ल्ड कप संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला. वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर व्यक्त केलेली नाराजी रायुडूला भोवल्याची चर्चा आहे. रायुडूच्या या निर्णयानंतर क्रिकेट वर्तुळातून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा येऊ लागल्या. त्यात एक शुभेच्छा ही कॅप्टन विराट कोहलीची होती. पण, कोहलीला रायुडूचं सांत्वन करणं चांगलेच महागात पडले. नेटिझन्सने कोहलीला ट्रोल करताना त्याची खिल्ली उडवली.
धवन व शंकर माघारी फिरूनही वर्ल्ड कप संघासाठी बदली खेळाडू म्हणून रायुडूच्या नावाचा विचार झाला नाही. बीसीसीआयनं रिषभ पंत व मयांक अगरवाल यांना लंडनला पाठवले. त्यामुळे रायुडू नाराज होता. त्यानं विजय शंकरच्या निवडीनंतर ती नाराजी सोशल मीडियावर व्यक्तही केली होती. पण, अखेरीस त्यानं निवृत्तीचा निर्णय घेतला. 33 वर्षीय रायुडूनं 55 वन डे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. गेली अनेक वर्ष मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली गेली, परंतु त्याला सातत्य राखता आले नाही.
कोहलीनं ट्विट केलं की,''पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तू चांगला माणूस आहेस.''