आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. तो मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडून पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून जेतेपद पटकावल्यानंतर रायुडूने निवृत्ती जाहीर केली होती.
मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने इंटरनॅशनल लीग ट्वेंटी-२०च्या दुसऱ्या पर्वासाठी MI Emirates संघाची आज घोषणा केली. २० सदस्यीय संघात एमिरेट्सने ८ नव्या खेळाडूंना करारबद्ध केले. यापैकी कुसल मेंडीस, अकिल होसेन, विजयकांत विश्वकांत हे प्रथमच MI family कडून खेळणार आहेत. तर अंबाती रायुडू ( मुंबई इंडियन्स २०१० - २०१७), कोरे अँडरसन ( मुंबई इंडियन्स २०१४ - २०१६), वकार सलामखैल ( MI केप टाऊन २०२३), ओडिन स्मिथ ( MI केप टाऊन २०२३) आणि नौस्तुश केनयिगे ( MI न्यू यॉर्क २०२३) हे पुन्हा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीत परतले आहेत.
यांच्यासह किरॉन पोलार्लड, ड्वेन ब्राव्हहो, निकोलस पूरन, ट्रेंट बोल्ट, फझहल फारूकी, आंद्रे फ्लेचर, मुहम्मद वासीम, झहूर खान, जॉर्डन थॉम्पसन, विलियम स्मीद, मॅकेनी क्लार्क व डॅनिएल मॉस्ली हेही संघात आहेत. १३ जानेवारी २०२४ पासून ही लीग सुरू होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सने ६.७५ कोटींत रायुडूला आपल्या ताफ्यात घेतले होते. २००२मध्ये १६ वर्षांचा असताना त्याने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध १७७ धावांची खेळी केली होती. २०११मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळला आणि २०१४ मध्ये त्याला MI ने पुन्हा संघात घेतले. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात आला. त्याने एकूण २०३ आयपीएल सामन्यांत ४३२९ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व २२ अर्धशतकांचा समावेश आहे.