Amit Mishra On Virat Kohli : २९ जून २०२४ रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करून ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला. या विजयासह रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. रोहित-विराटची जोडी आता केवळ वन डे आणि कसोटीमध्ये दिसेल. अशातच भारतीय खेळाडू अमित मिश्राने या जोडीबद्दल बोलताना एक मोठे विधान केले. अमित मिश्राने नुकतीच दिलेली एक मुलाखत फार चर्चेत आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या स्वभावात खूप फरक आहे. रोहित त्याच्या सहकारी खेळाडूंना खूप स्वातंत्र्य देतो. तो आजही पहिल्यासारखाच आहे. मात्र, विराटमध्ये खूप बदल झाला आहे. त्याच्यात आणि माझ्यात संवादही होत नाही. कर्णधारपद, ताकद आणि पॉवर मिळाल्याने तो परिस्थितीनुसार बदलत गेला. मात्र, रोहित असा नाही... हाच या दोघांमध्ये फरक आहे.
शुबमग गिलबद्दल रोखठोक मत शुबमन गिलला कर्णधारपद दिल्याबद्दल काय मत आहे. यावर मिश्रा म्हणतो की, मला वाटत नाही की त्याला कर्णधार बनवायला हवे. मी तिथे असतो तर मी त्याला कर्णधारपद दिले नसते. मी त्याला केवळ आयपीएलमध्ये पाहिले आहे, त्याला कर्णधारपद कसे सांभाळावे याची काहीच कल्पना नाही. शुबमन गिलला कदाचित मजबुरीतून आयपीएलमध्ये कर्णधार बनवण्यात आले होते. कारण गुजरात टायटन्सचा तत्कालीन कर्णधार हार्दिक पांड्या शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सकडे गेला तेव्हा गुजरात टायटन्सकडे कोणताच पर्याय नव्हता. पण, भारतीय संघाचा कर्णधार हा अनुभवी असावा. गिलकडे आताच्या घडीला काहीच अनुभव नाही. त्याला कर्णधारपद सांभाळताही येत नाही.
दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाचे कर्णधारपद शुबमन गिलने सांभाळले. गिलच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत ४-१ असा विजय मिळवला. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून गिलने आपली छाप सोडली. गिलने २०१९-२०२० मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व केले होते.