Amit Mishra on Shubhman Gill Captaincy : झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या शुबमन गिलवर माजी खेळाडू अमित मिश्राने सडकून टीका केली. गिलच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत ४-१ असा विजय मिळवला. अमित मिश्राने नुकतीच दिलेली एक मुलाखत फार चर्चेत आहे, ज्यात त्याला विचारण्यात आले की, शुबमन गिलला कर्णधारपद दिल्याबद्दल काय मत आहे. यावर मिश्रा म्हणतो की, मला वाटत नाही की त्याला कर्णधार बनवायला हवे. मी तिथे असतो तर मी त्याला कर्णधारपद दिले नसते. मी त्याला केवळ आयपीएलमध्ये पाहिले आहे, त्याला कर्णधारपद कसे सांभाळावे याची काहीच कल्पना नाही.
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून गिलने आपली छाप सोडली. गिलने २०१९-२०२० मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व केले होते. खरे तर मोजक्या सामन्यांमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याव्यतिरिक्त त्याला कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही. आयपीएल २०२४ मध्ये त्याला गुजरात टायटन्सचे कर्णधारपद मिळाले, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ आठव्या स्थानावर राहिला. याशिवाय कर्णधार म्हणून गिल संघर्ष करताना दिसला. यावर अमित मिश्राने तिखट प्रतिक्रिया देताना टीम इंडियाला केवळ एकच कर्णधार असावा असेही मत मांडले.
गिल कर्णधारपदासाठी पात्र नाही - मिश्रा
अमित मिश्राने आणखी सांगितले की, शुबमन गिलला कदाचित मजबुरीतून आयपीएलमध्ये कर्णधार बनवण्यात आले होते. कारण गुजरात टायटन्सचा तत्कालीन कर्णधार हार्दिक पांड्या शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सकडे गेला तेव्हा गुजरात टायटन्सकडे कोणताच पर्याय नव्हता. पण, भारतीय संघाचा कर्णधार हा अनुभवी असावा. गिलकडे आताच्या घडीला काहीच अनुभव नाही. त्याला कर्णधारपद सांभाळताही येत नाही.
दरम्यान, अलीकडेच भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका झाली. पाच सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना जिंकून यजमान झिम्बाब्वेने विजयी सलामी दिली होती. मात्र त्यानंतर विजयाची हॅटट्रिक मारून भारताने मालिका खिशात घातली. अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुबमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसले. दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या ४६ चेंडूत शतक झळकावण्याची किमया साधली. अखेरचाही सामना जिंकून पाहुण्या टीम इंडियाने ४-१ ने ट्वेंटी-२० मालिकेचा शेवट केला.