stunner catch by Suresh Raina - भारतीय संघाचा व चेन्नई सुपर किंग्सचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना याने बुधवारी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज लीगमध्ये अफलातून झेल टिपला. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेणारा सुरेश रैना सध्या Road Safety World Seriesमध्ये इंडिया लीजंड्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. रैनाने ऑस्ट्रेलिया लीजंड्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार शेन वॉटसनचा सोपा झेल टिपला, परंतु १६व्या षटकात त्याने हवेत झेपावून बेन डंकचा घेतलेला कॅच चर्चेत आला. २००६ मध्ये सुरेश रैनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध असाच अविश्वसनीय झेल टिपला होता.
रैनाने १८ कसोटी, २२६ वन डे व ७८ ट्वेंटी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यात त्याने अनुक्रमे ७६८ धावा, ५६१५ धावा व १६०५ धावा केल्या. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६२ विकेट्सही आहेत. रैनाने आयपीएलच्या २०५ सामन्यांमध्ये ५५२९ धावा केल्या आहेत आणि ज्यात २ शतकं आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. रैनाने १०९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६८७१ धावा व ४१ विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३०२ सामन्यांत ८०७८ धावा व ६४ विकेट्स आणि ट्वेंटी-२०त ३३६ सामन्यांत ८६५४ धावा व ५४ विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
३५ वर्षीय रैना प्रथमच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळतोय आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याच्या या झेलची चर्चा रंगली. इंडिया लीजंड्स संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार शेन वॉटसन व अॅलेक्स डूलान यांनी पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. राहुल शर्माने ही भागीदारी तोडली अन् २१ चेंडूंत ३० धावा करणाऱ्या वॉटसनचा झेल रैनाने टिपला. त्यानंतर युसूफ पठाणच्या गोलंदाजीवर डूलान ( ३५) यष्टीचीत झाला. बेन डंक भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत होता. १६व्या षटकात अभिमन्य मिथूनच्या गोलंदाजीवर डंकने पॉईंटच्या दिशेने फटका मारला. तिथे उभ्या असलेल्या सुरेश रैनाने हवेत झेप घेत चेंडू पकडला अन् डंकला माघारी जाण्यास भाग पाडले. डंकने २६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया लीजंड्सने १७ षटकांत ५ बाद १३६ धावा केल्या. पावसामुळे खेळ थांबवावा लागला.
Web Title: An absolute stunner catch by Suresh Raina in Road Safety World Series, he's still so good in that department, CSK post Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.