Join us  

मुंबई क्रिकेटमध्ये कारकीर्द घडविण्याची संधी!

मुंबई क्रिकेट संघटनेने क्रिकेटमध्ये कारकीर्द घडविण्याची संधी मुंबईकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी काही कोर्सेस सुरू केले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. यानिमित्ताने एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक यांच्याशी वरिष्ठ उपसंपादक रोहित नाईक यांनी केलेली बातचीत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 9:07 AM

Open in App

अजिंक्य नाईक, सचिव, एमसीए

एमसीएने सुरू केलेल्या कोर्सेसचा उद्देश काय?

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या नेतृत्वात अपेक्स काउन्सिलने एकत्रितपणे हे कोर्सेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. अनेक खेळाडू असे आहेत की त्यांना मुंबईकडून राज्यस्तरीय क्रिकेट खेळता येत नाही किंवा उच्चस्तरीय क्रिकेटसाठी त्यांची निवड होत नाही. परंतु, या खेळाडूंमध्ये क्रिकेटची चांगली समज असते. तसेच, अनेक क्रिकेटप्रेमी आहेत ज्यांना खेळाची पूर्ण माहिती असते. अशांसाठीही कोर्सेस सुरू करण्यात आले असून याद्वारे क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या खेळामध्ये कारकीर्द घडवू शकतात. 

हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर कशाप्रकारे संधी उपलब्ध होऊ शकते?

क्रिकेटमध्ये कारकीर्द करायची म्हणजे केवळ खेळाडू बनूनच पुढे जाता येत नाही. स्कोअरर (गुणलेखक), पंच, फिजिओ अशा अनेक प्रकारचे मार्ग उपलब्ध आहेत. हे मार्ग एमसीएने मुंबईकरांसाठी उपलब्ध केले आहेत. खेळणे नक्कीच पहिला पर्याय आहे. परंतु, खेळाडू म्हणून तुम्ही यशस्वी झाला नाहीत, तर इतर मार्गाने तुम्ही खेळामध्ये कारकीर्द करू शकतात. 

मुंबई क्रिकेटमधील सध्याच्या मनुष्यबळाविषयी काय सांगाल?

एमसीए अंतर्गत वर्षभर सुमारे शंभरहून अधिक स्पर्धा रंगतात. या स्पर्धांमध्ये पंच आणि स्कोअरर यांच्यासह फिजिओचीही मोठी गरज भासते. त्याचप्रमाणे सध्या विश्लेषक (ॲनालिस्ट) यांचीही मोठी मागणी होत आहे. मुंबई क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात विविध वयोगटांच्या स्पर्धा रंगतात. यामध्ये महिला गटात १५, १९, २३ वर्षांखालील आणि वरिष्ठ हे चार गट झाले. तसेच, मुलांच्या व पुरुष गटात १४, १६, १९ २३ वर्षांखालील आणि वरिष्ठ हे पाच गट खेळवले जातात. अशा एकूण ९ गटांत स्पर्धा रंगतात आणि या गटांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासते. सध्या हे मनुष्यबळ काहीसे मर्यादित असल्याने येथे नवोदितांसाठी मोठी संधी आहे. शिवाय हे चित्र संपूर्ण देशभरात आहे. इतर राज्यांमध्येही मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे जर का कोर्सेस करून मुंबई क्रिकेटमध्ये संधी नाही मिळाली, तरी इतर राज्यांमध्ये नक्कीच संधी मिळू शकते. त्यात आयपीएल आणि इतर अनेक लीग दरवर्षी आयोजित होतात. या स्पर्धांमध्येही संधी आहेत. 

या कोर्सेसचे स्वरूप कसे असणार आणि प्रतिसाद कसा मिळाला?

हे सर्व कोर्सेस एमसीएचे बीकेसी येथील इनडोअर अकादमीमध्ये शिकवले जातील. तसेच, प्रॅक्टिकल अभ्यासक्रम एमसीएच्या वानखेडे स्टेडियम, बीकेसी मैदान आणि कांदिवली येथील मैदानावर शिकवले जातील. उदा. पिच क्युरेटर. स्कोअरर, पंच यांचे प्रॅक्टिकल सेशन या मैदानावर होतील. येथे इंटर्नशिप करण्याची संधी नवोदितांना मिळेल. त्याचप्रमाणे मुंबईत क्लब क्रिकेट सामन्यादरम्यान नवोदितांना संधी दिली जाईल. कोर्सेस उपलब्ध करून देण्याची हे पहिले वर्ष असून मिळणारा प्रतिसाद पाहून दरवर्षी हे कोर्सेस ठेवू. सध्या तरी एमसीएला मोठा प्रतिसाद लाभला असून जे अर्ज आलेत त्यांची छाननी सुरू आहे.

 

टॅग्स :करिअर मार्गदर्शन