प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी होत आहे. अनंत अंबानी आणि राधिक राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीपासून ते रोहित शर्मापर्यंत विविध खेळाडूंनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या 'संगीत समारंभात' सहभागी होण्यासाठी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हजेरी लावली. यावेळी बॉलिवूड कलाकारांची उपस्थितीही लक्षणीय होती.
भारताचा विश्वविजेता कर्णधार रोहित शर्माने देखील अनंत आणि राधिका यांच्या लग्नाच्या संगीत समारंभाला हजेरी लावली. यावेळी रोहितची पत्नी रितीका सजदेह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, देविशा शेट्टी, तिलक वर्मा आदी उपस्थित होते. यादरम्यान नीता अंबानी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी रोहितला स्टेजवर आमंत्रित करून मिठी मारली. यावेळी नीता अंबानी भावुक झाल्या. त्यानंतर मिस्टर ३६० सूर्यकुमार यादवला आमंत्रित करण्यात आले. त्यानंतर 'कठीण काळ हा शेवट नसतो, खंबीर असणारी लोक याचा सामना करतातच', असे म्हणत नीता अंबानींनी हार्दिक पांड्याला आमंत्रित केले.
मुकेश अंबानी यांनी देखील यावेळी उपस्थितांना संबोधित करताना टीम इंडियाचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, मोठ्या कालावधीनंतर ट्रॉफी आपल्या घरी आली त्याचा आनंद आहे. महेंद्रसिंग धोनी इथे आहे, त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०११ मध्ये ही कामगिरी केली होती. आता २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाने आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कमाल केली. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. तुमचा आम्हाला अभिमान आहे.
दरम्यान, भारताने ट्रॉफी जिंकल्यानंतर सर्वत्र जल्लोष केला जात आहे. गुरुवारी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात व्हिक्टी परेड काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली. त्यानंतर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळाडूंसह चाहत्यांनी जल्लोष केला. मग बीसीसीआयने खेळाडूंना १२५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले.