मुंबई : पंचांचा निर्णय अंतिम असतो, असे आपण बऱ्याचदा ऐकतो. पंचांच्या निर्णयानुसार सामन्यातले सर्व निर्णय होतात. काही वेळा खेळाडू त्याचा विरोधही करतात. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने तर आपला रागच पंचांवर काढला. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ही घडना घडली.
हार्दिक पंड्या फलंदाजीला आला होता. बंगळुरुचा गोलंदाज ख्रिस वोक्सचा पहिला चेंडू त्याच्या बॅटजवळ गेला आणि तो यष्टीरक्षक क्विंटन डी'कॉकच्या हातात विसावला. तेव्हा बंगळुरुच्या खेळाडूंनी हार्दिक बाद झाल्याचे अपील केले आणि मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले. पण पंड्याने या निर्णयाविरोधात दाद मागण्याचे ठरवले. तिसऱ्या पंचांनी तो चेंडू पाहिला आणि पंड्याला नाबाद ठरवले. मैदानावरील पंचांनी आपला निर्णय बदलला आणि पंड्या नाबाद असल्याचे त्यांनी सांगितले.
मैदानावरील पंचांनी पंड्या नाबाद असल्याचे सांगितल्यावर कोहली त्यांच्याजवळ जाऊन वाद घालायला लागला. पंचांनी जे घडले ते कोहलीला सांगितले. पण कोहली काहीच ऐकायला तयार नव्हता. त्याने पंचांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. यावेळी कोहली पंचांवर चांगलाच भडकला. एका कर्णधाराला हे कृत्य न शोभणारे होते. त्यानंतर पंड्याने सलग दोन षटकार लगावले आणि कोहलीची चिडचिड सुरुच राहिली.