१२ एप्रिल हा दिवस कसोटी क्रिकेटमध्ये अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी ४४ वर्षांपूर्वी भारतीय संघाने यजमान वेस्ट इंडिजचा पोर्ट आॅफ स्पेन कसोटीमध्ये ४०३ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करीत पराभव केला होता. १२ एप्रिल हीच तारीख होती त्यावेळी वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने ४०० धावांची खेळी केली होती. ही कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक वैयक्तिक खेळी आहे. भारतीय अष्टपैलू व मांकडिंगचा जनक विनू मंकड यांचा जन्मही १२ एप्रिल रोजी झाला होता.
गावस्कर व विश्वनाथ विजयाचे शिल्पकार
१२ एप्रिल १९७६. पोर्ट आॅफ स्पेन त्रिनिदादचे क्वीन्स पार्क ओव्हल मैदान. वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याचा पाचवा व शेवटचा दिवस. सुनील गावस्कर आणि मोहिंदर अमरनाथ ज्यावेळी भारताचा डाव पुढे सुरू करण्यासाठी उतरले त्यावेळी स्कोअर होता १ बाद १३४. ४०३ धावांचे विशाल लक्ष्य गाठण्यासाठी भारताला त्यावेळी २६९ धावांची गरज होती. उपाहारानंतर मोहिंदरने एक टोक सांभाळून फलंदाजी केली आणि गुंडप्पा विश्वनाथने आक्रमक पवित्रा स्वीकारला. ११२ धावा काढून विश्वानाथ धावबाद झाले. त्यावेळी भारताची ३ बाद ३३६ अशी स्थिती होती. मँडेटरी षटकांत भारताला ६५ धावांची गरज होती. मैदानावर उतरलेल्या ब्रिजेश पटेल यांनी संस्मरणीय खेळी केली. दरम्यान, मोहिंदर अमरनाथ ८५ धावा काढून बाद झाले. पटेल ४९ धावा काढून नाबाद राहिले आणि भारताने ६ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला. क्रिकेट इतिहासात चौथ्या डावात सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा भारताचा हा विक्रम २७ वर्षे कायम राहिला. योगायोग हा की वेस्ट इंडिजनेच २००३ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध ७ बाद ४१८ धावा फटकावीत हा विक्रम मोडताना सामना ३ गडी राखून दिला. सध्या हा विश्वविक्रम आहे.
अखेरच्या दिवसातील तीन सत्रांमध्ये भारताला हे लक्ष्य गाठायचे होते. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३५९ धावा (व्हीव्ह रिचर्ड््स १७७, क्लाईव्ह लॉयड ६८) केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २२८ धावात (विश्वनाथ ४१, मदनलाल ४२) संपुष्टात आला. यजमान संघाने दुसरा डाव ६ बाद २७१ धावसंख्येवर (एल्विन कालीचरण नाबाद १०३) घोषित करीत भारतापुढे ४०३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. अखेरच्या दिवशी गावस्कर यांनी विंडीजच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला, पण उपाहारापूर्वी ते जुमादिनच्या गोलंदाजीवर बाद झाले. गावस्कर यांनी १३ चौकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या.
Web Title: ... and India reached the target of 4 runs, Gavaskar and Vishwanath sculpted the victory
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.