T20 World Cup 2022, ZIM beat PAK : झिम्बाब्वेकडून हार मानावी लागल्यानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू शोएब अख्तर, अकिब जावेद, मोईन खान, वकार युनूस व मिसबाह-उल-हक यांनी बाबर आजम अँड टीमचे वाभाडे काढले. रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने ( Shoaib Akhtar) संघ व्यवस्थापन, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांच्यावर जोरदार टीका केली. पण, ही टीका करत असताना अख्तरने टीम इंडियालाही शाप दिला.
What is FAKE Mr. BEAN Matter? पाकिस्तानचा इथेही खोटारडेपणा, झिम्बाब्वेने विजयानंतर काढली लाज
झिम्बाब्वे-पाकिस्तान सामन्यात काय झालं?झिम्बाब्वेने ८ बाद १३० धावा केल्या. वेस्ली मॅधेव्हेर ( १७) व क्रेग एर्व्हिन ( १९) यांनी आक्रमक सुरूवात केली, परंतु पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. सिन विलियम्स ( ३१) याने चांगला संघर्ष केला. रायन बर्ल ( १०) व ब्रॅड एव्हान्स ( १९) यांचेही योगदान लाभले. पाकिस्तानच्या मोहम्मद वासीमने ४ आणि शादाब खानने ३ विकेट्स घेतल्या. पाकिस्तान हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले होते. पण, मोहम्मद रिझवान ( १४) व बाबर आजम (४) अपयशी ठरले. इफ्तिखार अहमद ( ५) व हैदर अली (० ) यांनीही निराश केले. शान मसूद ४४ धावांवर बाद झाल्यानंतरही मोहम्मद नवाजने संघर्ष सुरू ठेवला होता. पण तोही अखेरच्या षटकात बाद झाला आणि १ चेंडूंत ३ धावा हव्या असताना शाहिन आफ्रिदी रन आऊट झाला. पाकिस्तानला ८ बाद १२९ धावा करता आल्या. सिकंदर रजाने ३ व ब्रॅड इव्हान्सने २ विकेट्स घेतल्या.
शोएब अख्तर काय म्हणतोय?हे सलामीवीर, मधली फळी आपल्याला एवढ्या मोठ्या स्पर्धेत यश मिळवून देण्यास सक्षम नाही, हे मी आधीपासूनच म्हणत आलोय. मी असं का म्हणतोय? तर पाकिस्ताला अत्यंत वाईट कर्णधार मिळाला. दुसऱ्याच सामन्यातून पाकिस्तान स्पर्धेबाहेर फेकला गेला आणि तेही झिम्बाब्वेकडून... बाबरला मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला ये असे सांगितले, परंतु त्याने नाही ऐकले. शाहिन आफ्रिदी पूर्णपणे तंदुरूस्त नाही आणि तरीही त्याला खेळवले,''असा शोएबने त्याच्या यू ट्यूब चॅनेलवर राग काढला.
तो पुढे म्हणाला, हे कोणत्या प्रकारचं क्रिकेट तुम्ही खेळताय... तुम्ही झिम्बाब्वेकडून हरलात, लाज वाटायला हवी. पीसीबी अध्यक्ष ते संघ व्यवस्थापक यांना अक्कल नाही. चार गोलंदाजांसह खेळण्याऐवजी आपण ३ जलदगती गोलंदाजाना खेळवले, मधल्या फळीतील खेळाडूंची निवड चुकली. फखर जमानला बाकावर बसवून ठेवलं. हा पराभव शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे.
मी आधीच सांगितलं होतं की पाकिस्तान या आठवड्यात स्पर्धेबाहेर पडेल आणि भारतीय संघ पुढील आठवड्यात उपांत्य फेरीत बाद होईल. भारतीय संघ काही तीस मार खान नाही. मला खूप राग आलाय आणि आता मला काही अपशब्द वापरायचे नाहीत, असे अख्तर म्हणाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"