बडोदा : सध्याचा जमाना हा ट्वेन्टी-20 क्रिकेटचा असला तरी फार कमी जणांना फलंदाजीत सातत्य राखता येते. कामगिरीत सातत्य राखण्यासाठी तुमच्याकडे गुणवत्ता, अचूक तंत्र, जिद्द, चिकाटी आणि चांगली मानसीकता असण्याची गरज असते. जर तुमच्याकडे या गोष्टी असतील तर तुम्ही धावांचे डोंगर रचू शकता, नवीन विक्रम प्रस्थापित करू शकता. अशीच एक गोष्ट भारतामध्ये घडली आहे. एका 14 वर्षाच्या मुलाने तब्बल 98 चौकार लगावत मोठी खेळी साकारली आहे.
बडोद्यामध्ये सध्या डी.के. गायकवाड 14-वर्षांखालील स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत तब्बल 98 चौकार आणि एक षटकार लगावत प्रियांशु मोलियाने 319 चेंडूंमध्ये 556 धावांची धडाकेबाज खेळी साकारील आहे. हा फलंदाज शिष्य आहे तो भारताचे माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांचा.
डी.के. गायकवाड 14-वर्षांखालील स्पर्धेत मोहिंदर अमरनाथ क्रिकेट अकादमीकडून प्रियांशु खेळला. यावेळी त्यांचा सामना योगी क्रिकेट अकादमीविरुद्ध होता. प्रियांशुच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे अमरनाथ यांच्या अकादमीला योगी संघावर तब्बल 690 धावांनी विजय मिळवता आला.
ही दणदणीत खेळी साकारल्यावर प्रियांशु म्हणाला की, " मी एवढी मोठी खेळी साकारेन, असे मला वाटले नव्हते. कारण ज्यावेळी माझे शतक झाले त्यावेळी मी द्विशतक झळकावू शकतो, असे मला वाटले होते. मी फक्त माझा खेळ खेळत गेलो आणि माझ्या धावा होत गेल्या. "