श्रीलंका : निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा नायक ठरला तो म्हणजे दिनेश कार्तिक. अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून त्याने भारताला थरारक विजय मिळवून दिला. पण फलंदाजीला मैदानात येण्यापूर्वी कार्तिक भारताचा कर्णधार रोहित शर्मावर रागावला होता आणि हाच राग त्याने काढला तो बांगलादेशच्या संघावर. कार्तिक यावेळी नेमका कसला राग आला होता, हे जाणून घेऊया.
बांगलादेशविरुद्धचा अंतिम सामना चांगलाच रंगतदार अवस्थेत होता. त्यावेळी एखादी चूक संघाला महागात पडू शकली असती. रोहित बाद झाला आणि त्याने विजय शंकरला फलंदाजीसाठी मैदानाता पाठवा, अशी खूण केली. त्यावेळी आपल्याला फलंदाजीला पाठवले जाईल, असे कार्तिकला वाटत होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे जेव्हा रोहित डगआऊटमध्ये आला तेव्हा कार्तिक त्याच्यावर चांगलाच रागावला. पण रोहितने कार्तिकला तेव्हा शांत केले.
रोहितने मोक्याच्या क्षणी आपल्याला फलंदाजीसाठी पाठवले नाही, हा राग कार्तिकच्या मना खदखदत होता. पण त्याने तो दाखवला नाही. आता फक्त मैदानात जायचे आणि ते गाजवायचे, हे कार्तिकने मनोमन ठरवले. पण हा राग डोक्यात ठेवून फलंदाजी करायची नाही, हेदेखील त्याला माहिती होते. त्यामुळे जेव्हा मनीष पांडे बाद झाला आणि कार्तिक मैदानात उतरला, तेव्हा कार्तिकने स्वत:ला शांत केले. मैदानात गेल्यावर कार्तिकने जी खेळी साकारली, ते लाजवाब अशीच होती.
कार्तिकपूर्वी शंकरला फलंदाजीला पाठवले असले तरी त्याला चांगली फटकेबाजी करता आली नाही. शंकरच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा पराभव नजीक दिसत होता. मात्र, खेळपट्टीवर आलेल्या अनुभवी दिनेश कार्तिकने 19व्या षटकात सर्व चित्रंच पालटले. त्याने रुबेल हुसैनच्या या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत एकूण 22 धावांची लयलूट केली आणि हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. अखेरच्या षटकात 12 धावांची गरज असताना शंकर पुन्हा एकदा चाचपडला, मात्र त्याने चौथ्या चेंडूवर एक चौकार मारला. पाचव्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात शंकर झेलबाद झाला, परंतु तोपर्यंत स्ट्राइक चेंज झाल्याने कार्तिक फलंदाजीला आला आणि अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना त्याने षटकार ठोकत भारताचा थरारक विजय साकारला.