- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर
लीड्स : कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने भारताचा कर्णधार विराट कोहली याच्याविरुद्ध बऱ्याचवेळा वर्चस्व गाजवले आहे. तिसऱ्या कसोटीतही अँडरसनचे हे वर्चस्व दिसून आले. त्याने कोहलीला तब्बल सातव्यांदा बाद केले असून कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनच्या विक्रमाशी बरोबरी केली. लियॉननेही कोहलीला ७ वेळा बाद केले आहे. त्याचप्रमाणे, स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड), मोइन अली (इंग्लंड), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) आणि बेन स्टोक्स (इंग्लंड) यांनी कोहलीला प्रत्येकी ५ वेळा बाद केले आहे.
जेम्स अँडरसनच्या नेतृत्वात जलदगती गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी बुधवारी भारताचा डाव फक्त ७८ धावांतच संपुष्टात आणला. त्यानंतर सलामीवीर हसीब हमीद आणि रोरी बर्न्स यांनी नाबाद शतकी भागीदारी करत संघाला बिनाबाद १२० या मजबूत स्थितीत पोहचवले. लॉर्ड्सवर मिळवलेल्या विजयानंतर हा भारतीय संघाला मोठा धक्का आहे.
हेडिंग्लेमध्ये भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा (१९) आणि अजिंक्य रहाणे (१८) यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्याशिवाय सर्वात मोठे योगदान हे अवांतर १६ धावांचे राहिले. इंग्लंडने पहिल्या डावात ४२ धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा हमीद १३० चेंडूत ११ चौकारांसह ६० धावा करून तर रोरी बर्न्स हा १२५ चेंडूत ५२ धावा करून खेळत होता.
अँडरसन याने शानदार स्विंगचे प्रर्दशन करत तीन बळी घेतले. त्याने सलामीवीर लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांना बाद केले. भारतीय फलंदजांना ऑफसाईड चेंडूला विनाकारण छेडण्याची शिक्षा मिळाली. पहिले पाच फलंदाज तर यष्टिरक्षक जोश बटलरकडे झेल देऊन बाद झाले.
भारताच्या अखेरच्या सहा गड्यांनी फक्त २२ धावा केल्या. उपहारानंतर संघ ४०.४ षटकांत सर्वबाद झाला. क्रेग ओव्हरटन याने तीन बळी घेतले. तर रॉबिन्सन आणि कुर्रन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अँडरसन याने तयार केलेल्या दबावाचा फायदा या गोलंदाजांनी घेतला. गेल्या नऊ महिन्यातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा भारतीय संघ १०० धावा देखील करु शकला नाही. या आधी ॲडलेडमध्ये फक्त ३६ धावात सर्वबाद झाला होता. भारताने या सामन्यात संघात एकही बदल केला नाही. तर इंग्लंडने डेव्हिड मालन आणि क्रेग ओव्हरटन यांना संघात जागा दिली.
भारत पहिला डाव
रोहित शर्मा झे. रॉबिन्सन गो. ओव्हरटन १९, लोकेश राहुल झे.बटलर गो. अँडरसन ०, चेतेश्वर पुजारा झे. बटलर गो. अँडरसन १, विराट कोहली झे. बटलर गो. अँडरसन ७, अजिंक्य रहाणे झे. बटलर गो. रॉबिन्सन १८, ऋषभ पंत झे. बटलर गो. रॉबिन्सन २, रवींद्र जडेजा पायचीत गो. कुर्रन ४, मोहम्मद शमी झे. बर्न्स गो. ओव्हरटन ०, इशांत शर्मा नाबाद ८, जसप्रीत बुमराह पायचीत गो. कुर्रन ०, मोहम्मद सिराज झे. रुट गो. ओव्हरटन ३, अवांतर १६, एकुण ४०.४ षटकांत सर्वबाद ७८ धावा
गडी बाद क्रम १-१,२-४,३-२१,४-५६,६-६७,७-६७,७-६७,८-६७,९-६७,१०-७८ गोलंदाजी अँडरसन ८-५-६-३, रॉबिन्सन १०-३-१६-२, कुर्रन १०-२-२७-२, मोईन अली २-०-४-०, ओव्हरटन १०.४-५-१४-३ इंग्लंड पहिला डाव :रोनी बर्न्स खेळत आहे ५२, हसीब हमीद खेळत आहे ६०, अवांतर ८ एकूण ४२ षटकांत बिनाबाद १२० धावा.
फलंदाजांनी केला घात!
n भारताची फलंदाजी उद्ध्वस्त झाली. लॉर्ड्सवरील जबरदस्त विजयानंतर अचानक झालेली घसरण कोणी अपेक्षित केली नव्हती.
n जेम्स अँडरसन ग्रेट गोलंदाज आहे. त्याने कोहली, पुजारा व रहाणेवर सातत्याने वर्चस्व राखले.
n भारताचे प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्याने संघ बॅकफूटवर गेला. भारतीय फलंदाज दडपण घेऊन का खेळले ते कळाले नाही.
n आता भारताच्या मधल्या फळीवर पुन्हा प्रश्न निर्माण होणार आहेत. ॠषभ पंत, रवींद्र जडेजाही अपयशी ठरली, विदेशात पुन्हा एकदा फलंदाज अपयशी ठरले.
n भारतीय गोलंदाजाचा माराही सुमार झाला. इंग्लंडच्या गोलंदाजांप्रमाणे त्यांच्याकडून स्विंग मारा झाला नाही.
- इंग्लंडच्या सलामीवीरांनी भक्कम पाया उभारुन दिला आहे. त्यामुळे आता भारताची वाटचाल बिकट झाली.
- पावसाचीही शक्यता अत्यंत कमी असल्याने भारताला पुनरागमनासाठी खूप घाम गाळावा लागेल.
- इंग्लंडची आघाडी जशी वाढेल तसे भारतावर दबाव वाढेल. जर इंग्लंड पुढील ७०-८० धावांत बाद झाले तर पुनरागमनाची संधी निर्माण होईल, पण याची शक्यता धुसर आहे.
- भारतीय संघ कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे फलंदाजीवर विचार करण्याची वेळ आली आहे. फलंदाजी भारताच्या पराभवास कारणीभूत ठरत आहे.
- पुजारा, रहाणे आणि कोहली या तिघांचे अपयश भारताला भोवत आहे.
Web Title: Anderson took wicket of Virat Kohli for seventh time; England take 'lead' over India pdc
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.