कोलकाता : आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर चौकार मारून सामना कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर केला. रिंकूने विजयी चौकार मारला असला तरी 'सामनावीर'चा पुरस्कार आंद्रे रसेलला देण्यात आला. रसेलने २३ चेंडूत ४२ धावा करून यजमानांच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. पण खुद्द रसेल देखील रिंकूच्या छोट्या खेळीचा चाहता झाला आहे. रिंकूने १० चेंडूत २१ धावांची नाबाद खेळी केली. अखेरच्या षटकात रिंकू सिंगला स्ट्राईक देताना रसेलने त्याच्या विकेटचा त्याग केला.
दरम्यान, सामन्यानंतर आंद्रे रसेलने अखेरच्या षटकादरम्यान रिंकूसोबत झालेल्या संवादाबद्दल सांगितले. रसेलने म्हटले, "रिंकूने मला पाचवा चेंडू खेळण्याआधी विचारले की, रस, जर हा चेंडू तुझ्याकडून मिस झाला तर काय? आपण धाव काढायची का? तेव्हा मी उत्तर दिले की, का नाही. मला आणि आमच्या संघाला रिंकूवर विश्वास आहे. तो एक महान फिनिशर आहे. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगविरूद्ध खेळणे डाव्या हाताच्या रिंकूसाठी सोपे होते."
अंगावर काटा आला - रसेल
रिंकू सिंगवर कौतुकाचा वर्षाव करताना रसेलने म्हटले, "त्याला पाहून मला आनंद होतो, त्याच्या यशामागे फ्रॅंचायझीचाही मोठा हात आहे. तो काय करू शकतो हे मला माहित आहे. तो वर्षानुवर्षे इथे आहे आणि त्याने त्याच्या मार्गाने काम केले आहे. तो आता जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला आहे. तो अतिशय शिस्तप्रिय, मेहनती आणि संघातील सर्वात मजेदार खेळाडू आहे. आम्ही चांगले मित्र आहोत."
"मी हे करेनच यावर माझा विश्वास होता", विजयी चौकार मारल्यानंतर रिंकू सिंगची प्रतिक्रिया
केकेआरचा अखेरच्या चेंडूवर विजय
शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांनी २७ चेंडूत ५४ धावांची भागीदारी नोंदवली. कोलकाताला विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी शेवटच्या षटकात ५ गडी गमावून पूर्ण केले. केकेआरला शेवटच्या षटकात सहा धावांची आवश्यकता होती. ६ धावांचा बचाव करण्यासाठी पंजाबचा कर्णधार शिखर धवनने अर्शदीप सिंगकडे चेंडू सोपवला. अर्शदीपने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्या बाजूने ठेवला पण रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत आपल्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Andre Russell applauds Rinku Singh's last ball boundary against Arshdeep Singh to give Kolkata Knight Riders victory during pbks vs kkr in IPL 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.